‘महाविकास आघाडीकडून सत्तेचा पूर्ण पुरेपूर वापर, पण मतदारांची पहिली पसंती भाजपच’, चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.

'महाविकास आघाडीकडून सत्तेचा पूर्ण पुरेपूर वापर, पण मतदारांची पहिली पसंती भाजपच', चंद्रकांत पाटलांचा टोला
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप


मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निकालानंतर राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली. (Chandrakant Patil thanked the voters, Criticism on Mahavikas Aghadi)

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजपा विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला आहे.

‘भाजपाला जनतेचा पाठिंबा टिकून आहे’

पाटील यांनी सांगितले की, राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती करून पूर्ण बहुमताने विजय मिळविला. त्यानंतर विरोधी पक्षात बसावे लागले तरीही भाजपाला जनतेचा पाठिंबा टिकून आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिडवणुकीत भाजपाला विजय मिळाला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल याचा आपल्याला विश्वास आहे.

‘ओबीसी उमेदवार देऊन भाजपाने आपली बांधिलकी पाळली’

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द केली होती आणि मतदारांवर पोटनिवडणुकीची वेळ आली. या जागा खुल्या झाल्या तरीही ओबीसी उमेदवार देऊन भाजपाने आपली बांधिलकी पाळली. मतदारांनी भाजपाला सर्वाधिक जागांवर विजयी करून पक्षाला पाठिंबा दिल्याचे निकालावरून दिसते. आपण मतदारांचे भाजपातर्फे आभार मानतो.

फडणवीसांचा शिवसेनेला सल्ला

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढत आहे, हे या निवडणुकीवरुन समजतं. शिवसेना रसातळाला जात आहे आणि भाजप एक नंबरचा पक्ष होत असल्याचं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. आमचे स्थानिक नेतेच नेतृत्व करतील, मोठे नेते प्रचाराला जाणार नाहीत. नागपूर जिल्हा परिषदेत एक जागा कमी झाली पण पंचायत समितीच जास्त यश मिळालं. राज्यात तीन पक्षांची स्पेस कमी होताना दिसत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. आता याचा विचार शिवसेनेनं करायचा आहे. यापुढेही आम्ही सगळी स्पेस अशीच खात राहणार, असा इशाराही फडणवीसांनी शिवसेनेला दिलाय.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला, नवनीत राणांची जहरी टीका

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

Chandrakant Patil thanked the voters, Criticism on Mahavikas Aghadi

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI