ऑक्टोबरमध्ये शनि वक्री, ‘या’ ३ राशींसाठी महिना तणावाचा, ‘हे’ उपाय देतील दिलासा!
ऑक्टोबर महिन्यात शनि वक्री अवस्थेत राहणार असल्याने काही राशींवर त्याचा प्रभाव जाणवू शकतो. ३ राशींसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणते उपाय करू शकतो, जाणून घेऊया.

व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनिचे महत्त्व सांगितले जाते. शनिच्या चालमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत असून, ऑक्टोबर महिनाभर त्यांची वक्री चाल कायम राहणार आहे. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पति आहे आणि ही जलतत्त्वाची रास मानली जाते. जलतत्त्वाच्या मीन राशीत शनिची वक्री चाल महत्त्वाची मानली जात असून, या काळात काही राशींना अनुकूल तर काही राशींना प्रतिकूल परिणाम जाणवू शकतात. कोणत्या राशींवर शनिच्या वक्री चालीचा परिणाम होऊ शकतो आणि या काळात कोणते उपाय सांगितले आहेत, जाणून घेऊया.
शनि वक्री म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषात शनिला कर्मफलदाता आणि न्यायाचा देवता मानले जाते. शनि वक्री असताना तो पृथ्वीवरून पाहताना मागे सरकत असल्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात ग्रह उलट्या दिशेने फिरत नसतो. ज्योतिषीय मान्यतेनुसार, शनि वक्री असताना जुन्या प्रलंबित कामांचा आढावा घेणे, चुका तपासणे आणि आपल्या कर्मांचे मूल्यांकन करण्याचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, २६ जुलै २०२६ रोजी शनि वक्री झाला आणि ११ डिसेंबर २०२६ रोजी तो पुन्हा मार्गी होईल. शनीची वक्री अवस्था साधारणपणे १३८ दिवस टिकते.
कोणत्या राशींवर सर्वाधिक प्रतिकूल परिणाम होतील?
ऑक्टोबर महिन्यात मीन राशीत होणाऱ्या शनीच्या वक्री गतीचा परिणाम मेष ते मीन अशा सर्वच राशींवर विविध प्रकारे होईल, परंतु काही विशिष्ट राशींना विशेष काळजी घेण्याची गरज भासू शकते.
सिंह
ऑक्टोबरमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. कुटुंबातील विषय शांततेने हाताळणे आणि वादविवाद टाळणे फायदेशीर ठरू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मकर
मकर राशीच्या व्यक्तींनी या काळात आर्थिक बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जुने कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळणे किंवा मेहनतीच्या तुलनेत परिणाम कमी मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खर्चाचे नियोजन करून आर्थिक बजेटनुसार पुढे जावे.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना नातेसंबंध आणि करिअरमध्ये काही चढ-उतार जाणवू शकतात. अचानक आर्थिक निर्णय घेणे टाळावे. कुटुंबातील विषयांमध्ये रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरू शकते. आत्मविश्वास कमी होणे किंवा जवळच्या व्यक्तीची नाराजी यांसारख्या गोष्टींचाही सामना करावा लागू शकतो. मात्र, संयमाने परिस्थिती हाताळल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
शनि वक्रीच्या काळात काय करावे?
ज्योतिषीय मान्यतेनुसार, मंगळवार आणि शनिवार हनुमान चालीसाचे पठण करणे, ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. तसेच शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ, मोहरीचे तेल किंवा काळ्या वस्त्रांचे दान करणे शुभ मानले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
