Special Story ! मुंबई पालिकेसाठी शिवसेनेचं ‘गुजराती’ कार्ड; ‘ढोकळा-वडापाव’ची गट्टी जमणार?

'केम छो, वरळी' म्हणत विधानसभा निवडणुकीत गुजराती मतदारांना साद घातल्यानंतर आता शिवसेनेने 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा दिला आहे. (Eye on BMC polls, ShivSena's snack diplomacy to woo Gujarati neighborhood)

Special Story ! मुंबई पालिकेसाठी शिवसेनेचं 'गुजराती' कार्ड; 'ढोकळा-वडापाव'ची गट्टी जमणार?
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 1:08 PM

मुंबई: ‘केम छो, वरळी’ म्हणत विधानसभा निवडणुकीत गुजराती मतदारांना साद घातल्यानंतर आता शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असा नारा दिला आहे. या निमित्ताने शिवसेनेने 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी गुजराती मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकल्यामुळे हा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने ढोकळा आणि वडापावची गट्टी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळेल याचा हा घेतलेला आढावा. (Eye on BMC polls, ShivSena’s snack diplomacy to woo Gujarati neighborhood)

2017 ला गुजराती कार्ड फसलं

2017मधील मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत वैशिष्ट्ये पूर्ण ठरली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजप पहिल्यांदाच आमनेसामने उभे ठाकले होते. 1989मध्ये शिवसेना-भाजपची युती झाली होती. तेव्हापासून या दोन्ही पक्षाने एकत्रित निवडणुका लढवल्या. मात्र, तब्बल 28 वर्षानंतर दोन्ही पक्ष आमनेसामने एकत्र आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. या निवडणुकीत शिवसेनेने 14 गुजराती उमेदवारांना तिकीट दिलं. त्यापैकी संध्या दोषी आणि राजूल पटेल हे दोनच उमदेवार निवडून आले होते. भाजपच्या पारड्यात गुजराती मतदारांनी मतांचं दान टाकल्याने शिवसेनेचं गुजराती कार्ड फसलं होतं.

… म्हणून जिलेबी, फाफडाकडे सेनेचा मोर्चा

2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सत्ता राखली, पण भाजपने मारलेली मुसंडी आश्चर्यकारक होती. त्यावेळी भाजपने 31 जागांवरून थेट 83 जागांवर मुसंडी मारली होती. मुंबईतील झाडून सर्व गुजराती मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाणारे गुजराती मतंही भाजपकडे गेली. भाजपला साथ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गुजराती मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. शिवसेनेसाठी हा आगामी काळातील मोठा धोका होता. त्यामुळेच शिवसेनेने वरळीत गुजराती मतदार नगण्य असतानाही ‘केम छो, वरळी’चा नारा दिला. वरळीतून आदित्य ठाकरे उभे होते. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवत होती. त्यामुळे ‘केम छो वरळी’ म्हणत शिवसेनेने गुजराती बांधव आमच्या जवळचे आहेत, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर आता पालिका निवडणुकीत ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातलीय. भाजपच्या व्होट बँकला सुरुंग लावण्याची शिवसेनेची ही खेळी असल्याचं जाणकार सांगतात.

30 गुजराती उमेदवार मैदानात उतरवणार?

2017च्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक फटका मुलुंड आणि अंधेरी पश्चिममध्ये बसला होता. या भागातील भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते. या भागात गुजराती मतदारांचं सर्वाधिक वर्चस्व आहे. त्यामुळे गुजराती मतदारांनी शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला. त्याशिवाय गिरगावसह उपनगरातल्या गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, घाटकोपर आदी भागातही शिवसेनेला मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे 2022च्या निवडणुकीत गुजराती मतदारांना आपलंस करण्यासाठी शिवसेनेकडून जास्तीत जास्त गुजराती उमेदवारांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. 2022मध्ये शिवसेना 227 पैकी 30 जागांवर गुजराती उमेदवार मैदानात उतवरण्याची शक्यता आहे. गिरगाव, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, घाटकोपर, अंधेरी, मुलुंड, विलेपार्ले आदी गुजराती बहुल मतदारसंघातच हे उमेदवार शिवसेनेकडून मैदानात उतरवून भाजपला जशास तसे उत्तर दिलं जाऊ शकतं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

2 आणि 26

227 नगरसेवक संख्या असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 97 नगरसेवक आहेत. त्यापैकी शिवसेनेचे दोनच नगरसेवक गुजराती आहेत. तर 83 नगरसेवक असलेल्या भाजपचे एकूण 26 नगरसेवक गुजराती आहेत. त्यामुळे शिवसेनेला 2 आणि 26 मधलं अंतर समजूनच राजकीय डावपेच टाकावे लागतील, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

15 लाखाहून अधिक गुजराती; 50 मतदारसंघात वर्चस्व

मुंबईत सुमारे 15 लाखाहून अधिक गुजराती मतदार आहेत. या मतदारांचा मुंबईतील सुमारे 50 वॉर्डात प्रभाव आहे. विशेष म्हणजे गुजराती समाजाच्या वस्त्याच्या वस्त्याच असल्याने त्यांच्या एक गठ्ठा मतदानाचा या मतदारसंघात प्रभाव पडतो. या 50 मतदारसंघात कोणत्या पक्षाला पाडायचं आणि कोणत्या पक्षाला विजयी करायचं हे गुजराती मतदार ठरवतात. 30 मतदारसंघात कुणाला निवडून आणायचं हे गुजराती मतदार ठरवतात. तर उरलेल्या 20 ते 25 मतदारसंघात गुजराती मतदारांची मते निर्णायक आहेत. त्यामुळे हे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडे महापालिकेत सध्या 83 नगरसेवक आहेत. हा गुजराती मतदार आपल्याकडून वळवून भाजपची नगरसेवक संख्या कमी करण्यावर शिवसेनेचा भर असेल. त्या दृष्टीनेच शिवसेनेने राजकीय जाळं फेकण्यास सुरुवात केल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

गुजराती मतदार शिवसेनेला स्वीकारणार?

मुंबईतील या 15 लाखाहून अधिक  गुजराती मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेनेने मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी गुजराती मतदार शिवसेनेला आपलसं करेलच याची शाश्ववती नाही. केवळ दोन ते तीन टक्केच गुजराती मतं शिवसेनेला पडतील, असं जाणकारांचं म्हणणं आहे. ‘केम छो, वरळी’च्या गर्जनेनंतर शिवसेनेने गेल्या वर्षभरात गुजराती समाजासाठी कोणताही कार्यक्रम राबवला नाही. गेली आठ महिने कोरोनाच्या संकटात गेले, त्यामुळे कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी गुजराती समाजाचा महापालिकेच्या सत्तेतून काही फायदाही करून दिलेला नाही. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेने गुजराती चेहऱ्याला पुढे आणलेले नाही. गुजराती नेत्याची संघटनेत उपनेतेपदी नियुक्ती करणे, मंत्रिमंडळात समावेश करणे, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी वर्णी लावणे आदी गोष्टी करणं अपेक्षित होत्या, त्याही शिवसेनेने केलेल्या नाहीत. शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर गुजराती समजाचं स्थान तसं नगण्यच असल्याने गुजराती मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू शकेल, असा चेहराच शिवसेनेकडे नाही. त्यामुळे त्याचा सेनेला फटका बसू शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

मराठी मतदार दुरावणार?

शिवसेनेने गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी या नादात मराठी मतदार त्यांच्या हातून सुटणार तर नाहीत ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. गुजराती मतदारांवर अधिक लक्ष दिल्यास मराठी मतदार दुखावू शकतात आणि हे मतदार मनसे किंवा काँग्रेसकडे जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेला गुजराती मतांची बेगमी करतानाच आपली पारंपारिक मराठी व्होटबँक राखण्याची कसरतही करावी लागणार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

2017मध्ये काय घडले?

2017ची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती. 2014पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची आलेली लाट, काँग्रेसचं सुरू झालेलं पतन, शिवसेना-भाजपमधील ताणतणाव आणि मनसेची होत असलेली पिछेहाट या सर्व गोष्टींचा प्रभाव 2017च्या पालिका निवडणुकीवर पडला. शिवाय गुजराती मते आपल्याकडे खेचण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी घडवून आणलेली भेट हा एक राजकीय खेळीचा भाग होता. या निवडणुकीत काँग्रेसची 51 वरून 31 जागांवर घसरण झाली. राष्ट्रवादीची 14 वरून 9 अशी पीछेहाट झाली. एआयएमआयएमनं मुंबईत खातं उघडलं, पण एमआयएमच्या एन्ट्रीनंतरही सपानं 6 जागा राखल्या. आधीच्या निवडणुकीत 28 नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसेच्या इंजिनाचा वेग मंदावत 7 जागांवर येऊन थांबला. तर, 31 जागांवरून भाजपने थेट 83 जागांवर धडक देऊन काहीही घडू शकते हे दाखवून दिलं.

वॉटर, मीटर, गटरवर भर

आगामी महापालिका निवडणुकीतही वॉटर, मीटर आणि गटर हे मुद्दे चर्चेत राहतील. शिवाय मुंबईत पावसाळ्यात भरणारे पाणी, मालमत्ता करात देण्यात येणारी सूट, पालिकेतील भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामे आदी मुद्द्यांवरून भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होईल. तर, शिवसेनेकडूनही त्याला तितक्याच ताकदीनं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे आगामी पालिका निवडणूक मुख्यत्वे शिवसेना विरुद्ध भाजप अशीच रंगणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

प्रयत्न चांगला, पण गट्टी जमण्यास वेळ लागेल

फाफडा-वडापावच्या निमित्ताने गुजराती-मराठींना एकत्र आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न चांगला आहे. पण त्यांची गट्टी जमायला वेळ लागेल. लगेच त्याचा फायदा होणार नाही. भविष्यात शिवसेनेला त्याचा फायदा होईल, असं ‘गुजरात समाचार’चे ज्येष्ठ पत्रकार कुणेश दवे यांनी सांगितलं. शिवसेनेने मराठी-अमराठी नारा देऊ नये. त्यांनी सर्वसमावेशक राजकारण करावं. तरच पक्ष विस्ताराला फायदा होईल, असं दवे म्हणाले. शिवसेनेने गुजराती समाजाला काहीच दिलं नाही, असं म्हणता येणार नाही. चंद्रिका केनिया आणि मुकेश पटेल यांना शिवसेनेने खासदारकी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेने गुजराती समाजाला काही दिलं नाही, असं म्हणणं हा सेनेवरील अन्याय होईल, असंही त्यांनी सांगितलं.

गुजराती मतदार भाजपवर नाराज

गुजराती मतदार भाजपवर खूश आहे, असं समजण्याचं कारण नाही. गुजराती मतदार भाजपवरही नाराज आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उपनगरात गुजराती समाजावर अन्यायच केला होता. पश्चिम उपनगरात गुजराती मतं निर्णायक असतानाही तिकडे मराठी उमेदवारांना तिकीट दिलं. विनोद तावडे, सुनील राणे ही त्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे गुजराती समाज भाजपवर नाराज आहे, पण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हा समाज भाजपला मतदान करतो, असं कुणेश दवे यांनी स्पष्ट केलं. अजून एक वर्ष आहे. शिवसेना या वर्षभरात गुजराती मतदारांसाठी काय करते त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Eye on BMC polls, ShivSena’s snack diplomacy to woo Gujarati neighborhood)

या भागात गुजराती मतदारांचं प्राबल्य

>> घाटकोपर >> चेबूरचा छेडा नगर परिसर >> मुलुंड >> विक्रोळी >> बोरिवली >> दहिसर >> कांदिवली >> मालाड >> अंधेरी पश्चिम >> गिरगाव >> विलेपार्ले

मुंबई महापालिका संख्याबळ

>> एकूण जागा: 227 >> बहुमताचा आकडा: 114 >> शिवसेना: 97 >> भाजप: 83 >> काँग्रेस: 29 >> राष्ट्रवादी काँग्रेस: 8 >> समाजवादी पार्टी: 6 >> एमआयएम: 2 >> मनसे: 1 >> अभासे: 1 (Eye on BMC polls, ShivSena’s snack diplomacy to woo Gujarati neighborhood)

संबंधित बातम्या:

‘उद्धव ठाकरे आपडा’, गुजराती मतांसाठी शिवसेनेचा मेळावा

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

(Eye on BMC polls, ShivSena’s snack diplomacy to woo Gujarati neighborhood)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.