Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा 'राज'मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्येला जाणार आहेत. राज यांच्या अयोध्या दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भीमराव गवळी

| Edited By: Nupur Chilkulwar

Feb 06, 2021 | 7:40 AM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्येला जाणार आहेत. राज यांच्या अयोध्या दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज यांच्या या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहे. राज यांची वाटचाल प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे चालली आहे… राजकीय कोंडी फोडण्यासाठी राज यांची ही अयोध्यावारी आहे… भाजपशी युती करता यावी म्हणून केलेली ही खेळी आहे… अशा चर्चांना उधाण आलं असून राज यांच्या या दौऱ्याचा थेट भाजपशीही संबंध जोडला जात आहे. त्यामुळे राज यांचा हा दौरा नेमका कशासाठी आहे? या दौऱ्यातून मनसेला कोणता ‘राज’मार्ग सापडणार आहे? याबाबतचा हा घेतलेला आढावा. (what is raj thackeray’s political agenda behind ayodhya visit?)

दौरा कधी?

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांचा हा दौरा 1 ते 9 मार्चदरम्यान असेल. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे मोजकेच पदाधिकारी असतील. 2011मध्ये राज ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी गुजरातमधील विकास कामे पाहून मोदींवर स्तुतीसुमनांची उधळण केली होती. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्यावर जाऊन राज काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टायमिंग साधला?

9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. त्याच दिवशी मनसेच्या स्थापनेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्यात पाच महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुढच्याच वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नावाने निर्माण झालेल्या समीकरणाचं आव्हान, दुसरीकडे भाजपचा वाढता जनाधार आणि मनसेला लागलेली उतरती कळा… या पार्श्वभूमीवर अयोध्येला जाऊन 9 मार्चच्या मेळाव्यात राज यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे वर्धापन दिनाचं औचित्य साधून मोठी राजकीय भूमिका घेऊन महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न करतील, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

परप्रांतीयांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे?

भाजपने मनसेसोबत युती करण्याची आधीच इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा व्यक्त करताना मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा सोडावा अशी अट भाजपने घातली आहे. त्यावर मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, राज यांचं अयोध्येला जाणं हीच मोठी प्रतिक्रिया असल्याचं बोललं जात आहे. अयोध्यावारीतून प्रांतवादाचा मुद्दा बॅकफूटला ठेवून हिंदुत्वाच्या अजेंड्यावर येत असल्याचं राज यांना अप्रत्यक्षपणे सांगायचं आहे. त्यासाठीच त्यांनी अयोध्यावारीचा बेत आखला असावा, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

शिवसेनेला पर्याय होणार?

शिवसेना महाविकास आघाडीत सामिल झाल्यापासून भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पदोपदी अडवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे… शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलंय… आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत… असं ठसवण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. परिणामी शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे राज यांच्याकडून हीच स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या हातून गेलेला मराठी मुद्दा घेऊन मनसेने रान उठवलं होतं. आता शिवसेनेच्या हातून गेलेलं हिंदुत्व घेऊन पक्षाची मरगळ झटकण्याची राज यांच्याकडून तयारी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर परप्रांतीयांचा मुद्दा आपोआपच मागे पडेल आणि त्यामुळे भाजपशी जवळीक साधण्याचा राजमार्गही मनसेला सापडेल, असं निरीक्षणही राजकीय जाणकार नोंदवतात.

उत्तर भारतात राज यांची क्रेझ

राज ठाकरे महाराष्ट्रात परप्रांतीयांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेतात. मनसेने अनेकदा परप्रांतियांना चोपही दिला आहे. त्यावरून उत्तर भारतीय नेते आणि राज यांच्यात शाब्दिक चकमकीही उडाल्या आहेत. असं असलं तरी राज यांची उत्तर भारतात सर्वाधिक क्रेझ आहे. राज ठाकरे यांचं दिसणं, त्यांचं वक्तृत्व, सभेतील त्यांचा वावर, सेलिब्रिटी आणि दिग्गजांची ‘कृष्णकुंज’वर हजेरी लावणं आदी गोष्टींचा उत्तर भारतीय तरुण-तरुणींमध्ये प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे राज यांच्या दौऱ्यामुळे उत्तर भारतीयांमधील त्यांची क्रेझ अधिकच वाढण्याची शक्यता आहे. शिवाय या दौऱ्यात राज हे त्यांची परप्रांतीयांबाबतची भूमिका मांडण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर प्रदेशात जाऊन परप्रांतीयांबाबतची भूमिका मांडल्यास राज यांना भविष्यातील राजकीय समीकरणं जुळवण्यास सोपं जाणार असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

आधी दौरा नंतर युती?

अयोध्या दौऱ्यानंतर मनसेची बऱ्यापैकी हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण होऊ शकते. त्याचा फायदा त्यांना भाजपशी युती करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे. भाजपसोबत युती करण्यासाठी काही तरी ठोस कारण हवं. आणि मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा सोडल्याचं भासवण्यासाठी मनसेकडून काही तरी कृती होणं अपेक्षित आहे. अयोध्या दौरा आणि राज यांची होऊ शकणारी हिंदुत्ववादी प्रतिमा ही कारणं युतीसाठी पुरेशी असल्याने त्या दृष्टीने मनसेच्या हालचाली सुरू असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. (what is raj thackeray’s political agenda behind ayodhya visit?)

दरेकरांचे संकेत

राज यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा होताच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी युतीचे संकेत दिले आहेत. राज यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यास चांगलं वातावरण तयार होईल. हिंदुत्वादी विचारधारा असलेले पक्ष आणि संघटना एकत्र येत असतात. त्यामुळे बरंच काही घडू शकतं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप-मनसे मुंबई महापालिकेच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. (what is raj thackeray’s political agenda behind ayodhya visit?)

संबंधित बातम्या:

Special Story: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ काय होतं?; वाचा विशेष रिपोर्ट!

Special Story: खलिस्तान चळवळ काय आहे? सुरुवात कुठून? भारताची डोकेदुखी का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

Special Story : गडकरी! मोदींच्या काळातही ‘आवाज’ असणारा नेता, कामही एकदम कडक

(what is raj thackeray’s political agenda behind ayodhya visit?)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें