Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या चार ठिकाणी खर्च करा, पैसा दुप्पट होणार
आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी त्या काळात पैशांच्या नियोजनाबद्दल बोलताना अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही काळाशी सुसंगत वाटतात, चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी कुटनीती बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की युद्धामध्ये राजाची रणनीती काय असावी? शत्रू आणि मित्र कसे ओळखावेत? आयुष्यात कोणापासून सावध रहावं? आणि कोणावर विश्वास ठेवावा? अशा गोष्टी चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. मात्र चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ देखील होते, त्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं याबद्दल देखील चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत. दरम्यान चाणक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ते म्हणतात या ठिकाणी तुम्ही जर पैसा गुंतवला तर निश्चितच त्याचा दुप्पट परतावा तुम्हाला मिळणार आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?
मुलांचं शिक्षण – चाणक्य म्हणतात मुलं ही तुमच्या म्हतारपणाची काठी असते, म्हतारपणात मुलंच तुमचा सांभाळ करणार असतात. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की, मुलांना चांगलं शिक्षण आणि संस्कार द्यावेत, जर मुलांचं शिक्षण उत्तम असेल तर त्याला रोजगारही चांगला मिळेल आणि तुमचा सांभाळ देखील चांगला होऊ शकतो, म्हतारपणात तुम्हाला काम करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीही वाया जात नाही, तो तुम्हाला त्याचा दुप्पट परतावा देतो.
गरजू व्यक्तीला मदत करा – चाणक्य म्हणतात गरजू व्यक्तीला मदत केली पहिजे, कारण अशी व्यक्ती कधीही तुमचे उपकार विसरत नाही, ती तुमच्या उपकारांची नक्कीच परतफेड करत असते. जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा ती व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येते.
समाज सेवा – चाणक्य म्हणतात ज्यांना शक्य आहे, अशा लोकांनी आवश्य समाज सेवा करावी, समाजासाठी दान करावं, पैसा खर्च करावा. त्यामुळे तुम्हाला शांती मिळते, पैसा योग्य कार्यासाठी खर्च होतो, आणि तुमची किर्ती वाढते, ज्याची किंमत ही पैशांपेक्षा अधिक असते.
आजारी माणसाला मदत करा – चाणक्य म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे, त्याने आजारी माणसाची देखील मदत केली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती लाभते.
