Chanakya Niti : या तीन गोष्टी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये असतात दुप्पट, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य म्हणतात स्त्रियांमध्ये तीन गोष्टी अशा असतात ज्या पुरुषांपेक्षा दुप्पट असतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये केवळ राजा कसा असावा आणि त्याने राज्य कारभार कसा करावा? एवढंच सांगितलेलं नाही तर माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? कुठे किती पैसा खर्च करावा? याबद्दल देखील विस्तृत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर चाणक्य यांनी त्या काळात पुरुष आणि स्त्रियांचा व्यवहार कसा असतो, याचं देखील सूक्ष्म निरीक्षण करून, त्यांना जे अनुभव आले, ते त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडले आहेत. चाणक्य म्हणतात भलेही स्त्रियांची ताकद पुरुषांपेक्षा कमी असेल मात्र स्त्रियांमध्ये अशा तीन गोष्टी असतात ज्या पुरुषांपेक्षा दुपटीने जास्त असतात, चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि आर्य चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
लज्जा – चाणक्य म्हणतात लज्जा किंवा लाज हा स्त्रीचा स्वाभाविक गुण आहे, हा गुण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुपटीने अधिक असतो. काही गोष्टी असतात, कोणाशी बोलायचं असेल किंवा अन्य काही काम असेल तर पुरुष लाजत नाहीत, मात्र त्या तुलनेत स्त्रियांमध्ये लज्जा जास्त असते.
प्रेम – चाणक्य म्हणतात प्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगावर राज्य करू शकतात. पुरुषांपेक्षा हा गुण स्त्रियांमध्ये जास्त असतो. कारण स्त्रीया या माता असतात. आपल्या मुलावर एक आई किंवा आपल्या भावावर एक बहीण जेवढं प्रेम करते, तेवढं जगात इतर कोणीही करू शकत नाही. त्यामुळे प्रेम हा महिलांचा स्वभावच असतो. त्यामुळे प्रेम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये दुप्पट असते. स्त्रीचं आपल्या कुटुंबावर एवढं प्रेम असतं की ती आपल्या कुटुंबासाठी कितीही कष्ट करायला तयार असते.
समजूतदारपणा – चाणक्य म्हणतात पुरुषांपेक्षा स्त्री या अधिक समजूतदार असतात. तसेच त्या पुरुषाच्या तुलनेत वयानं आणि मनानं लवकर मोठ्या होतात, तसं निसर्गाचं त्यांना वरदानच असतं. त्यामुळे एखाद्या बिकट परिस्थितीमध्ये पुरुष जेवढा समजूतदारपणा दाखवत नाहीत, तेवढा समजूतदारपणा स्त्रीया दाखवतात.
आदर करा – चाणक्य सल्ला देतात की पुरुषांनी नेहमी स्त्रियांचा आदर करावा, कारण संसारामध्ये जेवढी महत्त्वाची भूमिका ही पतीची असते, तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त भूमिका ही पत्नीची असते. संपूर्ण घराचा डोलारा ही स्त्री सांभांळत असते, त्यामुळे पुरुषांनी नेहमी स्त्रियांचा आदर करावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
