Dhanatrayodashi 2026: धनत्रयोदशीला चौमुखी दिवा का लावतात? जाणून घ्या यम दीप लावण्याची योग्य वेळ आणि दिशा
धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाच्या नावाने चौमुखी दिवा लावण्याची परंपरा आहे. हा दिवा लावण्यामागे धार्मिक महत्त्व काय आहे, तो कोणत्या वेळी आणि कोणत्या दिशेला लावावा, तसेच दिवा लावताना कोणते नियम पाळावेत, जाणून घ्या.

धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सणातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. यंदा शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर यम राजाच्या नावाने चौमुखी दिवा लावला जातो. या दिव्याला यम दीप असे म्हणतात. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, या श्रद्धेतून हा दिवा लावला जातो. मात्र, यम दीप लावताना योग्य वेळ आणि दिशा पाळणे महत्त्वाचे मानले जाते. जाणून घेऊया यम दीपाचे धार्मिक महत्त्व आणि तो लावण्याचे नियम.
धनत्रयोदशी 2026 पूजा मुहूर्त • धनत्रयोदशी : शुक्रवार, 6 नोव्हेंबर • पूजा मुहूर्त : संध्याकाळी 6:02 ते 7:57 • एकूण कालावधी : 1 तास 56 मिनिटे • प्रदोष काळ : संध्याकाळी 5:32 ते रात्री 8:09 • वृषभ काळ : संध्याकाळी 6:02 ते 7:57
यम दीपाचे धार्मिक महत्त्व
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यम राजाच्या नावाने चौमुखी दिवा लावण्यामागे कुटुंबाचे अकाली मृत्यूच्या भीतीपासून रक्षण व्हावे आणि घरात सुख-शांती नांदावी, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी चार वाती असलेला दिवा घराबाहेर लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांवर येणारी संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
यमदीप लावण्याची योग्य वेळ आणि दिशा
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यम दीप लावणे शुभ मानले जाते. यंदा शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार असून, संध्याकाळी 5:32 ते रात्री 8:09 हा प्रदोष काळ आहे. या काळात हा चौमुखी दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. दक्षिण दिशा ही यम राजाची दिशा मानली जाते.
यासाठी मोठा आणि जुना दिवा घ्यावा. त्यामध्ये चार वाती ठेवून मोहरीचे तेल भरावे. संध्याकाळी हा दिवा मुख्य दरवाजाबाहेर लावावा. दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नये, असेही धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते.
यम दीप लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
• यमराजाचे स्मरणः दिवा लावताना मनात यम राजाचे स्मरण करावे. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करावी. • स्वच्छ जागेची निवडः दिवा लावल्यानंतर तो मुख्य दरवाजाजवळील स्वच्छ जागी ठेवावा. येणाऱ्या-जाणाऱ्या कोणाचाही पाय दिव्याला लागणार नाही, याची काळजी घ्यावी. • दुसऱ्या दिवशी काय करावे: दिवा पूर्णपणे विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो आदरपूर्वक उचलून योग्य ठिकाणी ठेवावा. • नियमांचे पालन: यम दीप लावताना योग्य वेळ, दिशा आणि इतर नियमांचे पालन करावे. यामुळे ही धार्मिक परंपरा श्रद्धेने पूर्ण करता येते.
