Garud Puran Story : नॉनव्हेज खाल्ल्याने पाप लागतं का? गरूड पुराण काय म्हणतं?
गरुड पुराणात मांसाहाराबाबत विविध कथा आणि दृष्टिकोन सांगितले आहेत. श्रीकृष्ण आणि मगध राज्याच्या कथेद्वारे मांसाहाराचे पाप आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. मगध राज्यातील दुष्काळ आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया यातून मांसाहाराच्या विकल्पांचा विचार करण्यास प्रेरित केले आहे.

आजकाल लोकांमध्ये मांसाहाराचं प्रमाण अधिकच वाढलं आहे. मांसाहाराबद्दल लोकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोक मांसाहाराला चांगले मानतात, तर काही लोक त्याला वाईट मानतात. मांसाहार करण्यासंबंधी भगवद गीता आणि इतर अनेक पुराणांमध्ये माहिती दिली गेली आहे. त्यातच एक गरुड़ पुराण आहे. गरुड़ पुराणानुसार, मांसाहारामुळे खरंच पाप होतं का? त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. गरुड पुराणात नेमकं काय म्हटलंय याचा शोध घेणार आहोत.
गरुड़ पुराणाची कथा :
गरुड़ पुराणात श्रीकृष्णाशी संबंधित एक कथा आहे, ज्यात भगवान श्री कृष्ण म्हणतात की, मांसाहार कधीही योग्य ठरवता येत नाही. गरुड़ पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, एकदा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी बसून बासरी वाजवत होते. त्यावेळी त्यांना एक हरण धावत येताना दिसले. ते हरण धावत भगवान श्रीकृष्णांच्या मागे लपले.
तत्पूर्वी तिथे एक शिकारी आला. त्याने भगवान श्रीकृष्णांना सांगितले की, तो त्या हरणाची शिकार करुन खाणार आहे. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की, कोणत्याही प्राण्याची हत्या करणे आणि त्याला खाणे हे पाप आहे. त्यावर, मला वेदांची माहिती नाही. म्हणून मांसाहार पाप आहे की पुण्या आहे हे माहीत नाही, असं या शिकाऱ्याने श्रीकृष्णाला सांगितलं. त्यानंतर श्रीकृष्णाने त्याला एक कथा सांगून मांसाहार खाणं कसं पाप आहे, याची शिकवण दिली.
मगध राज्याची कथा :
कथेप्रमाणे, एकदा मगध राज्यात मोठा दुष्काळ पडला, ज्यामुळे राज्यात अन्नाचा एक दाणाही पिकला नाही. त्यामुळे मगधचा राजा चिंतित झाला आणि त्या संकटावर उपाय शोधू लागला. त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून राज्यातली समस्या काय आहे, यावर चर्चा केली. एका मंत्र्याने धान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मांसाहाराला प्रोत्साहन देण्याचा पर्याय सांगितला. परंतु मगधच्या प्रधानमंत्र्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावर राजाने त्याला त्याचं मत विचारलं असता प्रधानमंत्र्याने राजाकडून एक दिवसाची मुदत मागितली. एक दिवस विचार करून सांगतो, असं तो म्हणाला.
ज्या मंत्र्याने मांसाहार करण्याचा पर्याय सूचवला होता, त्याच्याकडे त्या रात्री प्रधानमंत्री जातो. राजा गंभीर आजारी असल्याचं त्याला सांगतो. तसेच एखाद्या ताकदवान पुरुषाचे दोन तीन तोळे मांस मिळालं तर राजा बरा होईल, असं वैद्याचं मत असल्याचंही त्याला सांगतो. तू तुझ्या शरीरातील दोन तीन तोळे मांस देऊन राजाला वाचवू शकतो का? असं प्रधान त्याला विचारतो. तसेच मांस दिल्यास एक लाख सोन्याची नाणी आणि राज्याची मोठी जहांगिरी देण्याचं अमिषही त्याला दाखवतो. त्यावर तो मंत्रीच प्रधानाला एक लाख सोन्याची नाणी देतो आणि कुणाचं तरी मांस देऊन राजाला जीवनदान देण्याची विनंती करतो. अशाच प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्यांच्या घरी जाऊन हीच मागणी केली. त्यावेळी त्याला मंत्र्याने दिलेलं तेच उत्तर प्रत्येकाकडे ऐकायला मिळालं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा राज दरबार भरला. यावेळी राजा ठणठणीत असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रधानाने राजा समोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली आणि राजाला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. सोन्याची नाणी आणि राज्य देऊ केलं तरी एकाही मंत्र्याने त्यांच्या शरीराचं मांस देण्यास नकार दिल्याचं राजाला सांगितलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांने राजाला एक प्रश्न केला. मांस स्वस्त आहे की महाग आहे हे तुम्हीच सांगा. त्यानंतर राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्यांनी दुष्काळ पडला असला तरी अधिक मेहनत करण्याचं फर्मान प्रजेला बजावलं. काही दिवसानंतर प्रजेच्या मेहनतीला फळ आलं आणि शेताशेतात पिकं तरारून आली. श्रीकृष्णाने ही कथा सांगितल्यानंतर हरणाची शिकार करायला आलेल्या शिकाऱ्याचं मन बदललं. त्याने नॉनव्हेज खाणं आणि शिकार करणंही सोडून दिलं.