खोटं बोलून ऑफिसमधून सुट्टी घेणे पाप आहे का? प्रवचनादरम्यान एका व्यक्तीने विचारला प्रश्न; प्रेमानंद महाराजांनी काय दिले उत्तर
प्रेमानंद महाराजांच्या दरबारात नेहमीच गर्दी असते. प्रत्येकजण त्यांच्याकडून समस्यांचे निवारण करण्यासाठी येतात. अनेक प्रश्नही मांडतात. असाच एकाने पश्न विचारला की 'ऑफिसमध्ये खोटे बोलून रजा घेणे पाप आहे का?' त्यावर महाराजांनी काय उत्तर दिले जाणून घेऊयात.

अनेकदा ऑफिसमध्ये किंवा काही ठिकाणी न येण्याचं किंवा न उपस्थित राहण्याचं कारण सांगताना नाईलाजाने खोटं बोलण्याची वेळ येते. तेव्हा परिस्थिती तशी असते किंवा समोरच्या व्यक्तीमुळे खोटे बोलावे लागते. त्यावेळी आतून त्रास होत असतो. वाईटही वाटत असतं पण पर्याय नसतो. मग अशावेळी अपराधी भावना घेणं बरोबर असते की नाही यामध्ये गोंधळ होतो. असाच काहीसा प्रश्न एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारला आहे.
वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांचे देशभरात अनुयायी आहेत. जे त्यांच्या दर्शनाला येत असतात. त्यांचे प्रवचन ऐकायला आपल्या समस्या मांडायला येत असतात. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांना फॉलो करतात. तसेच त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन येत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. म्हणूनच देशभरातून लोक वृंदावन मंदिरात प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. प्रत्येकाला प्रेमानंद महाराजांच्या दरबारात येऊन नतमस्तक व्हायचं होत असतात. अशा परिस्थितीत, लोक अनेकदा प्रेमानंद महाराजांना काही असामान्य प्रश्न विचारतात. ते प्रश्न असे असतात जे ऐकून किंवा त्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात. काहीजणांचे प्रश्न देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रेमानंदजींच्या दरबारात एका व्यक्तीने असाच प्रश्न विचारला जो ऐकून ते हसू लागले. तसेच त्यांनी त्यावर मजेशीर उत्तरही दिलं आहे.
ऑफिसमध्ये खोटे बोलून रजा घेणे पाप आहे का?
दरबारात प्रेमानंद महाराजांना विचारलं की, “मी एका खाजगी कंपनीत काम करतो. कधीकधी मला तातडीच्या कामासाठीही रजा मिळत नाही. पण जर मी माझ्या आजी, काका किंवा इतर नातेवाईकाच्या मृत्यूसारखे निमित्त सांगितले तर मात्र मला लगेच रजा मिळते.” त्या व्यक्तीने पुढे असेही म्हटले की, “तुम्ही खरे बोलून ऑफिसमध्ये रजा मागितली तर तुम्हाला ती मिळत नाही. पण जर तुम्ही खोटे बोललात तर तुम्हाला ती लगेच मिळते” त्यालाच जोडून अजून एका व्यक्तीने प्रश्न विचारला “जर मी दर दीड महिन्याला वृंदावनला जाण्यासाठीही रजा मागितली तरी मिळणार नाही. आजही मी ऑफिसमध्ये खोटे बोलून इथे आलो. तर, खोटे बोलून ऑफिसमध्येही रजा घेणे पाप आहे का?”
प्रेमानंद महाराज प्रश्न ऐकून हसले अन्
या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी प्रेमानंद महाराज मोठ्याने हसले आणि नंतर म्हणाले की “हा कलियुगाचा परिणाम आहे. खोटे ऐका आणि खोटे बोला, खोटे खा आणि खोटे चावा. पण काहीही झाले तरी खोटे बोलणे हे पाप आहे.” पुढे प्रेमानंद महाराजांनी एक श्लोक वाचला, ‘सत्याइतका तप नाही अन् खोट्याइतके मोठे पाप नाही. ज्याच्या हृदयात सत्य राहते त्याच्याच मनात देव राहतो.’
प्रेमानंद महाराज यांनी काय उत्तर दिलं?
प्रेमानंद महाराज यांनी कोणत्याही परिस्थितीत नेहमी सत्याचीच साथ देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ” आपण समस्यांशी लढले पाहिजे. आपण प्रत्येक क्षणी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर खोटे बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथापि, भजन, धाम आणि देवाच्या प्राप्तीसाठी खोटे बोलणे हे खोटे नाही. जर आपण देवाची पूजा करण्यासाठी किंवा त्याचे दर्शन घेण्यासाठी खोटे बोललो तर त्यात काही अडचण नाही. पण आपण कधीही सांसारिक हेतूंसाठी खोटे बोलू नये.”
