Mahashivratri 2021 guidelines : महाशिवरात्रीनिमित्त गृहविभागाकडून महत्त्वाच्या 7 सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी शिवरात्री हा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आव्हान गृह विभागाकडून करण्यात आलं आहे. (Maharashtra government issues new guidelines for Mahashivratri 2021 covid 19 cases lockdown news update)

  • Updated On - 7:10 pm, Wed, 10 March 21
Mahashivratri 2021 guidelines : महाशिवरात्रीनिमित्त गृहविभागाकडून महत्त्वाच्या 7 सूचना
कपालेश्वर मंदिर

मुंबई : कोरोनामुळे यावर्षात सण, उत्सव आणि कार्यक्रम अतिशय साधेपणानं साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यातील रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करत या वर्षी महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन गृह विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. (Maharashtra government issues new guidelines for Mahashivratri 2021 covid 19 cases lockdown news update)

मंदिरांमध्ये गर्दी करू नये…

देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरी करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील भिमाशंकर, परळी-वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर या देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सर्व मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

लोक घरातून पूजा करतील अशी जनजागृती करावी

दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवमंदिरात मोठया प्रमाणात पूजाअर्चा केली जाते आणि दर्शनासाठी अनेक भाविक त्याठिकाणी गर्दी करत असतात. मात्र यावर्षी भाविकांनी घराबाहेर न पडता घरात राहूनच पूजा करावी, यासाठी प्रशासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकावेळी मंदिरात 50 भाविकांना दर्शन

प्रत्येक शिवमंदिरात एकावेळी 50 भाविक दर्शन घेतील, यादृष्टीनं संबंधित विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इ.) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

मंदिर परिसरात फुल विक्रेत्यांची गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे..

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार आणि फुल विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं तंतोतंत पालन होईल याकडे मंदीराचे व्यवस्थापक आणि स्थानिक प्रशासन यांनी विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्याच्या सूचना आहेत.

लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना मंदिरात नेऊ नये..

प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावं. जेष्ठ नागरीक आणि लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये.

ऑनलाईन दर्शनाची सोय करुन द्यावी..

महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केवल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.

कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं..  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

संबंधित बातम्या

‘त्या’ इमारतीतील कोरोना रुग्णांचा घर क्रमांक सूचना फलकावर लिहिणं बंधनकारक; पालिकेचे आदेश

सचिन वाझे म्हणजे लादेन नाही, दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवई करणार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI