तुमच्या कुंडलीत मंगळ कोणत्या स्थितीत आहे? मंगळ कमकुवत असल्यास…
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील मंगळाची स्थिती व्यक्तीच्या स्वभावावर, आरोग्यावर आणि नशिबावर मोठा परिणाम करते. तिसरे, सहावे, दहावे आणि अकरावे घर मंगळासाठी बलवान मानली जातात, तर आठवे, बारावे, दुसरे आणि पाचवे घर कमकुवत असते.

आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या स्वभाव, आरोग्य आणि नशिबावर परिणाम करते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. यातीलच एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे मंगळ. कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत आहे की कमकुवत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपल्या कुंडलीतील मंगळाचे नेमके स्थान काय आणि त्याचे परिणाम काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हा मंगळ कुंडलीतील तिसऱ्या घरात (पराक्रम, धाकटे भावंडे), सहावे घर (शत्रू, कर्ज, रोग), दहावे घर (करिअर, वडील) आणि अकराव्या घरात (नफा, उत्पन्न) असतो, तेव्हा तो मजबूत स्थितीत मानला जातो. याउलट मंगळ आठव्या घरात (वय, वारसा, अचानक घडणाऱ्या घटना), बाराव्या घरात (खर्च, परराष्ट्र व्यवहार, रुग्णालय), काही प्रमाणात दुसऱ्या घरात (संपत्ती, कुटुंब) व पाचव्या घरात (मुले, शिक्षण) असेल, तेव्हा तो कमकुवत स्थितीत आहे, असे मानले जाते. जे काही लोकांसाठी अशुभ ठरू शकते.
जर मंगळ लग्न (पहिल्या), चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात असेल, तर मंगळ दोष निर्माण होतो. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात, असे मानले जाते. मंगळ जेव्हा त्याच्या स्वराशीत म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीत असतो आणि त्याची उच्च राशी मकर असते, तेव्हा तो अत्यंत प्रबळ असतो. याकाळात तो लोकांना शुभ परिणाम देतो. याउलट, जेव्हा मंगळ त्याच्या कमकुवत राशी कर्कमध्ये असतो, तेव्हा तो दुर्बळ होत जातो.
जर मंगळावर शुभ ग्रहांची (उदा. गुरु) दृष्टी असेल, तर तो बलवान असतो. परंतु, अशुभ ग्रहांची (उदा. शनि, राहू, केतू) मंगळावर दृष्टी असेल किंवा ते मंगळासोबत असतील, तर मंगळ कमकुवत मानला जातो.
कुंडलीत मंगळ कमकुवत असेल तर काय होते?
कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास व्यक्तीमध्ये अतिरिक्त राग, चिडचिड, आक्रमकता (किंवा धैर्याचा अभाव), हट्टीपणा, अहंकार आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती दिसू शकते. याशिवाय, आत्मविश्वासाचा अभाव, चुकीचे निर्णय, भावंडांशी बिघडलेले संबंध, वारंवार दुखापती, अपघात, पचनाच्या समस्या, थकवा, करिअरमध्ये अडथळे, आर्थिक घसरण, लग्नात विलंब किंवा वैवाहिक जीवनात मतभेद ही लक्षणे दिसू शकतात.
मजबूत मंगळ असलेल्यांना काय फायदा होतो?
ज्यांच्या कुंडलीत मंगळ मजबूत स्थितीत असतो, अशी व्यक्ती उत्साही, धाडसी आणि निर्भय असतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता असते. क्रीडा, सैन्य किंवा पोलीस दलात त्यांना यश मिळते. लहान भावंडांशी त्यांचे संबंध चांगले असतात. ते निष्पक्ष आणि प्रामाणिक असतात. त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले असते. त्यांची रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती मजबूत असते. त्यांना दुखापत आणि अपघातांपासून संरक्षण मिळते. करिअरमध्ये प्रचंड यश, प्रगती आणि आर्थिक लाभ मिळतात. तसेच मालमत्तेचा आनंद घेता येतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
