उद्या नागपंचमी, जाणून घ्या या दिवशी काय करावं? अन् काय करू नये?
उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. चला तर मग जाणून घेऊयात, या दिवशी काय करावं आणि काय करू नये? त्याबद्दल.

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा केली जाते, श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं. या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी. उद्या म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. चला तर मग जाणून घेऊयात, या दिवशी काय करावं आणि काय करू नये? त्याबद्दल.
काय करावं?
नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबत नागदेवतेची देखील पूजा करावी.महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी. सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी, किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली तरी चालते. नागदेवतेला दूध अर्पण करावं, अशी मान्यता आहे, की नागदेवतेची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहातो.
अशी देखील एक मान्यता आहे की, या दिवशी केवळ उकडलेलंच अन्न खावं, या मागे अनेक कारण आहेत, श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो, पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं, त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे. या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेलेली आहे, ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात. शहरी भागात ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागांमध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात. या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात, या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात, ही प्रथा आजही ग्रामीण भागांमध्ये सुरू आहे.
नागपंचमीला काय करू नये?
अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे, महाराष्ट्रातही एक -दोन ठिकाणी, पूर्वी ही प्रथा सुरू होती, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत नागाची पूजा करू नये, त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्याच्या जीवाला हानी पोहचण्याची शक्यता असते, तसेच सर्पदंश झाल्यास तुम्हाला देखील जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत साप पकडू नये, असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवू नये. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश हा सण देतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
