भक्ती, शक्ती, आस्थेचा महाउत्सव… त्रिवेणी संगमावर समरसता; महाकुंभाचं महापर्व जाणून समजून घ्या
प्रयागराज येथील कुंभमेळा हा श्रद्धा आणि एकतेचा महा उत्सव आहे. संत, साधू आणि लाखो भाविकांचा हा संगम अध्यात्माचे प्रचंड केंद्र आहे. कुंभमेळ्यातील विरोधाभास, संतांचे तप आणि राजकारणाचे मिश्रण यावर प्रकाश टाकले आहे. हा लेख कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्यातील सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही चर्चा करतो.

प्रयागराज येथे उद्यापासून महाकुंभाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षातील हा पहिला महाकुंभ असणार आहे. त्यानंतर पुन्हा 12 वर्षानंतर महाकुंभ येईल. कुंभ म्हणजे समरसतेचा उत्सव आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठं लोक पर्व आहे. आस्थेची त्रिवेणी आहे. संवादाचा मोठा मंच आहे. अध्यात्मिक ऊर्जेचं मोठं केंद्र आहे. अध्यात्माचा एवढा मोठा उरुस भारतात दुसरा भरत नाही. त्यामुळेच या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असतं. देशातीलच नव्हे तर विदेशातूनही लोक महाकुंभ पाहायला येतात. काही तर केवळ महाकुंभ पाहण्यासाठी येतात. पण जात नाहीत. कारण वैराग्य आल्याने तेही साधू बनतात. संसाराचा त्याग करतात. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी मास कम्युनिकेशनचं काम महाकुंभमधून होत असतं. ...
