Shravan 2025 : बेलपत्र की पाणी, शिवलिंगावर आधी काय अर्पण करावं? पूजा कशी कराल? जाणून घ्या A टू Z माहिती
श्रावण महिना जवळ आला आहे आणि शिवभक्तांना शिवपूजेबाबत अनेक प्रश्न पडतात. लेखात पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाने शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा, पाणी आणि बेलपत्र कोणत्या क्रमाने वाहवे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

श्रावण महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. श्रावण महिना म्हणजे शिवशंकरांच्या भक्तांसाठी एक पर्वणीच असते. यंदा २५ जुलैपासून श्रावण सुरु होत आहे. श्रावण महिन्यात लाखो शिवभक्त आपल्या लाडक्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी व्रत, जप, अभिषेक पठण करण्यात रमून जातात. श्रावणात दर सोमवारी भगवान शिव शंकराच्या मंदिरात गर्दी होते. अनेक भक्त शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलपत्र वाहताना दिसतात. यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. पण शिवलिंगावर आधी जल अर्पण करावं की बेलपत्र वाहावं, असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.
शिवमंदिरात गेल्यावर शिवलिंगाची पूजा करण्याचे काही नियम असतात. जे प्रत्येक भक्ताला माहिती असणे गरजेचे आहे. भोपाळचे प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा शिवपूजा कशी करायची? शंकराचा अभिषेक कसा करायचा? शिवलिंगावर आधी जल अर्पण करावं की बेलपत्र वाहावं? याबद्दलचे सविस्तर उत्तर दिले आहे.
पूजेची योग्य पद्धत काय?
पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान शिव शंकराला अभिषेक सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे शिवपूजेची सुरुवात नेहमी अभिषेकाने करावी. हा अभिषेक करताना सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावं. त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप या पंचामृताचा वापर करून अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक झाल्यावर शिवलिंग पुन्हा शुद्ध पाण्याने धुवावं. यानंतर त्यावर बेलपत्र, पांढरी फुले, हार यांसारखी इतर पूजा सामग्री अर्पण करावी.
शिवलिंगावर आधी जल का अर्पण करावे?
शिव पुराण, स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की, शिवपूजेची सुरुवात पाण्यानेच करायला हवी. जल हे आवाहनाचं (निमंत्रणाचं) प्रतीक मानलं जातं. जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं, तेव्हा शीतलता मिळते. यामागे एक अख्यायिकाही सांगितली जाते. समुद्रमंथनातून निघालेलं ‘हलाहल’ विष जेव्हा भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी प्राशन केलं. त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला. हा दाह शांत करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जलअर्पण केले जाते. भगवान शिव शंकराला शीतलता मिळण्यासाठी जल सर्वात महत्त्वाचं आहे.
बेलपत्राचं महत्त्व काय?
बेलपत्र हे शिव शंकराला सर्वात प्रिय आहे. पण ते जल अर्पण झाल्यानंतरच वाहावे. जलामुळे शिवलिंगातील ऊर्जा सक्रिय होते. बेलपत्र ती ऊर्जा स्थिर करण्याचं काम करतं. त्यामुळे, आधी जल अपर्ण करुन त्यानंतर बेलपत्र अर्पण करणं योग्य मानलं जातं. बेलपत्र हे कायम अखंड असावं. ते कधीही तुटलेलं, कापलेलं, खराब झालेलं नसावं. बेलपत्र हे पूर्ण तीन पानांचे असावे. बेलपत्र वाहताना ‘ॐ नमः शिवाय’ चा जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
चुकीचा क्रम, तर काय होतं?
जर चुकून आधी बेलपत्र आणि नंतर जल अर्पण केलं गेलं, तर पूजेचा क्रम बदलतो. पूजा करताना ती योग्य क्रमात करणे गरजेचे आहे. भावनेच्या आणि नियमांच्या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्रावणात शिवलिंगावर आधी शुद्ध जल आणि त्यानंतरच इतर पूजा सामग्री अर्पण करावी. शास्त्रानुसार, भगवान शंकर त्याच भक्तांवर प्रसन्न होतात, ज्यांचं मन निर्मळ असतं. जे कपटापासून दूर असतात आणि जे सच्च्या मनाने भक्ती करतात. जे स्वतःच्या भल्याऐवजी सर्वांसाठी विचार करतात. धर्माच्या मार्गावर चालतात. कधीही फसवणूक करत नाहीत, अशा लोकांवर भगवान शंकर प्रसन्न होतात.
