Vastu Shastra : जुनं घर खरेदी करताय? मग हे उपाय कराच, सर्व प्रकारचे वास्तुदोष होतील दूर
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरात वास्तुदोष का निर्माण होतो? आणि तो दूर करण्यासाठी काय करावं? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आज आपण जुनं घर खरेदी केल्यानंतर काय उपाय केले पाहिजेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

आपलं स्वत:च हक्काचं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. प्रचंड कष्ट करतो. परंतु अनेकदा खूप कष्ट करून देखील नवं घर खरेदी करणं हे अनेकांना शक्य होतं नाही. तेव्हा अनेक लोक आपल्या बजेटमध्ये बसणारं आणि नव्या घराच्या तुलनेनं थोडं स्वस्त असल्यानं जुनं घर खरेदी करण्याचा पर्याय निवडतात, आपल्या घराचं स्वप्न साकार करतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा जुनं घर खरेदी करता तेव्हा त्यामध्ये अनेक वास्तुदोष असण्याची शक्यता असते. तुमच्यापूर्वी त्या घरात जे कुटुंब राहत होते, त्या कुटुंबाच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी या घराशी जोडल्या गेलेल्या असतात. हे घर एक प्रकारे त्या कुटुंबांशी जोडलेलं असतं. त्यामुळे जेव्हा ते कुटुंब तुम्हाला त्यांचं घर विकतं तेव्हा ते तर घर सोडून जातात, मात्र घरातील वास्तुदोष कायम असतात. अशा परिस्थितीमध्ये त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे जुनं घर खरेदी करताना काय काळजी घ्यायची? काय उपाय करायचे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
काय उपाय करावेत?
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून घर खरेदी करता तेव्हा ते घर तुमच्या मालकीचं होतं. त्यामुळे जर अशा घरात काही वास्तुदोष असतील तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे, त्यामुळे अशा घरात प्रवेश करण्यापूर्वी घराची वास्तुशांती करणं गरजेचं असतं, जर वास्तुशांती नाही झाली तरी कमीत कमी गृह प्रवेशाच्या वेळी कलश पूजन आणि गणपतीचं पूजन तर आवश्य करावं. नव्या घरात अन्नदान करावं. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात. नव्या घरात प्रवेश केल्यानंतर सर्व वस्तू या त्यांच्या योग्य दिशेनुसारच ठेवाव्यात.
तुम्ही जेव्हा नवीन घरात प्रवेश करता, तेव्हा सर्वात आधी त्या घराला कलर द्यावा, यामुळे तुमचं घर प्रसन्न वाटेल, घराला आलेली मरगळ नव्या कलरमुळे दूर होईल, आणि वास्तुदोष देखील दूर होईल. जुनं घर खरेदी करताना कोणताही वास्तुदोष राहू नये, यासाठी वास्तुशास्त्रात आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी थोडीशी मोहरी घेऊन ती घरावरून ओवाळून टाकावी, त्यामुळे प्रत्येक वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
