Vastu Shastra : घरात पिंपळाचं झाडं उगवणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात जी जर तुमच्या घरात लावली तर ती अत्यंत शुभ फळ देतात, मात्र अशी देखील काही झाडं असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आज आपण पिंपळाचं झाडं घरात उगवणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूप महत्त्व आहे, अनेक धार्मिक कार्याच्या प्रसंगी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाखाली ब्रम्ह विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं स्थान आहे, तसेच पिंपळाशी संबंधित असे अनेक उपाय आहेत, ज्यामुळे पितृदोष दूर होतो. पिंपळ वृक्षाची नियमित पूजा केल्यास घरातील वास्तूदोष दूर होऊन, तुम्हाला कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही, घरात बरकता येते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे पिंपळ तुमच्या घराच्या अंगणात उगवतो तेव्हा हा वृक्ष काही खास संकेत देत असतो, त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
घरात पिंपळाचं झाड उगवणं शुभ की अशुभ?
धर्मशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार घरात पिंपळाचं झाडं उगवणं शुभ मानलं जात नाही. कारण जेव्हा पिंपळाचं झाड तुमच्या घराच्या अंगणांत उगवतं, तेव्हा त्याच्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घराच्या अंगणामध्ये पिंपळाचं झाड उगवतं तेव्हा घरामध्ये गृहकलह वाढतो, अचानक धनहानी होते, घरात शांतता राहत नाही, आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात.
पिंपळाच्या झाडाचे काय आहेत संकेत?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घराच्या अंगणात पिंपळाचे झाड उगवते तर त्याचे पुढील संकेत असू शकतात. काहीही कारण नसताना घरात सारखे भांडणं होणं. कुटुंबातील सदस्यांसोबत सारखा वाद, अचानक धनहानी, घरात वास्तुदोष निर्माण होणं. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्याचा परिणाम हा तुमच्यासोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबावर देखील होऊ शकतो, अनेकदा असं देखील होतं की एखादी गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करतात मात्र त्यामध्ये तुम्हाला अपयश येतं, त्याचं हे देखील एक कारण असू शकतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
घरात पिंपळ उगवला असेल तर काय करायचं?
जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा इतर ठिकाणी पिंपळ उगवला असेल आणि तो तुम्हाला काढून टाकायचा आहे, तर त्यासाठी शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा, त्यानंतर रविवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्यानंतर भगवान विष्णूंचं नामस्मरण करा व पिंपळाच्या झाडाला मुळासकट उपटा, त्यानंतर या झाडाला इतर ठिकाणी किंवा जिथे मंदिर आहे, अशा ठिकाणी पुन्हा लावा, घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
