क्रिकेटमधून निवृत्तीबाबत युवराज सिंहचे मोठं विधान

क्रिकेटमधून निवृत्तीबाबत युवराज सिंहचे मोठं विधान

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह त्याच्या ढासळत्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेटमधील पुढील वाटचालीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता युवराजने स्वतः याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ‘जेव्हा वेळ आली आहे असे मला वाटेल, तेव्हा सर्वातआधी मीच निवृत्ती घेईन’, असं युवराजने स्पष्ट केलं.

युवराज म्हणाला, ‘जेव्हा वेळ येईल, तेव्हा सर्वात प्रथम मीच निवृत्ती घेईन. मागील 2 वर्ष माझ्यासाठी खूप चढउताराचे होते. त्यामुळे मी काय करायला हवे याचा मला निर्णय घेता आला नाही. आत्मपरीक्षण केल्यानंतर मी अंडर 16 प्रमाणेच खेळाचा आनंद घेत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे राष्ट्रीय संघातील निवडीबाबत काहीही विचार करत नाही.’

टी-20 विश्वकप 2007 आणि वन डे विश्वचषक 2011 मध्ये भारताला विजय मिळवून देण्यात,  37 वर्षीय युवराजची मोलाची भूमिका होती.

मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून युवराज टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. शिवाय युवराजला आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, आयपीएलच्या नव्या सत्रात रविवारी झालेल्या सामन्यात युवराजने मुंबई इंडियन्सकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली. युवराजने अर्धशतक झळकावत  53 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना मुंबई इंडियन्सचा 37 धावांनी पराभव झाला.

Published On - 6:16 pm, Mon, 25 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI