टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्माची नकोशी शून्याची हॅटट्रीक, लाजिरवाणा विक्रम केला नावावर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माच्या कारकि‍र्दीला उतरती कला लागल्याचं दिसत आहे. त्याच्या फलंदाजीला नजर लागली की काय? असंच म्हणावं लागेल. स्पर्धेत तब्येत खराब झाली आणि त्याचा परिणाम फलंदाजीवर झाल्याचं दिसून येत आहे. आता नेदरलँडविरुद्धही शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्माची नकोशी शून्याची हॅटट्रीक, लाजिरवाणा विक्रम केला नावावर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्माची नकोशी शून्याची हॅटट्रीक, लाजिरवाणा विक्रम केला नावावर
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2026 | 8:19 PM

टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा नंबर 1 फलंदाज आहे. अभिषेक शर्मा समोर असला की भल्याभल्यांना घाम फुटतो. पण आता अभिषेक शर्माला एका धावेसाठी घाम गाळावा लागत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड असेल असं क्रीडातज्ज्ञ सांगत होते. पण साखळी फेरीत त्याचा फ्लॉप शो पाहता प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मा तीन सामने खेळला आणि तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सलग तीन वेळा शून्यावर बाद होणार जगातील कमनशिबी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणच्याच नावावर नव्हती. पण आता अभिषेक शर्मा या पंगतीत पहिलाच जाऊन बसला आहे. भविष्यातही हा विक्रम कोणी मोडेल असं वाटत नाही. त्यामुळे आता येत्या काळात या नकोशा विक्रमाची कायम चर्चा होत राहील.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली होती. पण सराव सामन्यापासून त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. सराव सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट हा चिंतेचा विषय ठरला होता. पण तेव्हा त्याच्या खेळीकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं होतं. पण आता त्याची झळ बसत आहे. कारण अभिषेक शर्मा संघात असून नसल्यासारखा आहे. 20-25 धावा वेगाने केल्या तरी बरं वाटतं. पण आता तर तसं काहीच नाही. उलट चार पाच चेंडू खेळून शून्यावर बाद होत आहे. एक दोन नाही तर तीनवेळा असंच झालं. अमेरिका, पाकिस्तान आणि आता नेदरलँडविरुद्ध शून्यावर बाद झाला.

अभिषेक शर्मा शून्यावर बाद होण्याची मालिका न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून सुरू आहे. या मालिकेत दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आता तीन वेळा शून्यावर तंबूत परतला. म्हणजेच मागच्या 7 डावात अभिषेक शर्मा पाचवेळा खातंही खोलू शकलेला नाही. अभिषेक शर्मा 38 टी20 डावात सहावेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकलं ाहे. केएल राहुल 54 डावात पाचवेळा शून्यावर बाद झाला होता. रोहित शर्मा यादीत आघाडीवर आहे. रोहित शर्मा दहा वेळा शून्यावर बाद झाला. पण त्याने 124 टी20 डाव खेळले आहेत. त्या तुलनेत हे काहीच नाही.