IND vs ZIM: शुभमन गिलने जिंकलं, प्रसिद्ध माजी खेळाडू म्हणतो, तो भविष्यातील भारताचा कॅप्टन
IND vs ZIM: नुकत्यात संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात (IND vs ZIM) भारताने 3-0 असा क्लीन स्वीप विजय मिळवला. या मालिकेत एका खेळाडूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं, तो म्हणजे शुभमन गिल.

मुंबई: नुकत्यात संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात (IND vs ZIM) भारताने 3-0 असा क्लीन स्वीप विजय मिळवला. या मालिकेत एका खेळाडूने सर्वांच लक्ष वेधून घेतलं, तो म्हणजे शुभमन गिल. शुभमन गिलने (Shubhaman Gill) या सीरीज मध्ये आपल्या बॅटची कमाल दाखवली. पहिल्या वनडेत नाबाद 82 तर तिसऱ्या वनडेत थेट शतकाला गवसणी घातली. अवघ्या 22 वर्षाच्या या मुलाने झिम्बाब्वे दौऱ्यात आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून दिला. शुभमन गिलने बॅटिंग करताना आपल्या स्ट्रोक प्लेने सर्वांची मन जिंकून घेतली. भारताचा माजी अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगही (Harbhajan Singh) शुभमन गिलच्या बॅटिंगच्या प्रेमात पडला आहे. शुभमन गिल भारताचा भविष्यातील कॅप्टन असल्याचं मत हरभजन सिंगने व्यक्त केलं. शुभमन गिल हा विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या पंक्तीत बसणारा खेळाडू आहे, असंही हरभजन म्हणाला.
शुभमनने कोणाला समर्पित केलं शतक?
शुभमन गिलने आपलं पहिलं शतक प्रथम कोच वडिलांना समर्पित केलं. फलंदाजीतल्या तांत्रिक बाबींबद्दल शुभमनने नेहमीच आपल्या वडिलांचा सल्ला घेतलाय. झिम्बाब्वे विरुद्ध दुसऱ्या वनडेत 33 धावांवर शुभमन ज्या पद्धतीने आऊट झाला, ते त्याच्या वडिलांना आवडलं नव्हतं. गिलने ही कसर तिसऱ्या वनडेत भरुन काढली.
वेस्ट इंडिज विरुद्धची कसर झिम्बाब्वे सीरीज मध्ये भरुन काढली
गिलने 2019 साली न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मॅचद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर पुढच्याचवर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं. गिल मागच्या काही सामन्यांपासून शानदार फॉर्म मध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचं शतक थोडक्यात हुकलं होतं. मागच्या महिन्यात पोर्ट ऑफ स्पेन मध्ये तो 98 धावांवर नाबाद राहिला. पावसामुळे या सामन्यात षटकं कमी करण्यात आली होती. वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीज मध्ये गिलने एकूण 205 धावा केल्या होत्या. शुभमनने वेस्ट इंडिज विरुद्ध राहिलेली कसर झिम्बाब्वे विरुद्ध भरुन काढली. 97 चेंडूत त्याने 130 धावा फटकावताना 15 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारताने झिम्बाब्वे समोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवलं.
