आकाश चोप्राने भारत-पाकिस्तान संघाची एकत्रित प्लेइंग 11 निवडताना काढली लाज, म्हणाला…
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान टीम इंडियाने 42.3 षटकात पूर्ण केलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील हायव्होल्टेज पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने एकहाती जिंकला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला डोकं वर काढू दिलं नाही. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भारत पाकिस्तान सामन्यातील संयुक्त प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या प्लेइंग 11 मध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान मिळालेलं नाही. याचा अर्थ असा की भारताविरुद्धच्या सामन्यात एकाही पाकिस्तानी खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. प्रत्येक खेळाडूची तुलना केल्यानंतर भारतीय संघ वरचढ ठरला. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये फक्त भारतीय खेळाडूंनाच संधी मिळाली.
‘रोहित शर्मा आणि बाबर आझम यांची सलामीवीर म्हणून तुलना केली तर हिटमॅन सरस ठरला. तर शुबमन गिल हा इमाम उल हकपेक्षा चांगला फलंदाज आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी सलामीवीर म्हणून निवडली’, असं आकाश चोप्राने सांगितलं. तिसऱ्या स्थानावर सउद शकील आणि विराट कोहली यांच्यापैकी विराटचं पारडं जड हे सांगायला नको. श्रेयस अय्यर हा मोहम्मद रिझवानपेक्षा चौथ्या क्रमांकावर योग्य फलंदाज ठरला.
आकाश चोप्राने पुढे सांगितलं की, ‘उर्वरित खेळाडूंसाठी सलमान अली आगा, खुशदिल शाह आणि तय्यब ताहिर यांचा विचार केला तर केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे त्यांच्या तुलनेत सर्वोत्तम खेळाडू आहेत. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.’ त्यामुळे पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची प्लेइंग 11 मध्ये निवड झालेली नाही.
आकाश चोप्राने भारत पाकिस्तान संघातील निवडलेली प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार),शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
