अर्जुन तेंडुलकरला घेतल्याचा लखनौ सुपर जायंट्सला पश्चाताप! एका विकेटसाठी दिल्या 326 धावा
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून घेतलं आहे. पण त्याचा फॉर्म पाहता आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. नेमकं काय झालं आणि कसं ते समजून घ्या.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु असून आतापर्यंत एकूण सहा सामने पार पडले आहेत. या स्पर्धेत गोव्याकडून खेळणारा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर पूर्णपणे फेल गेला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. अर्जुन तेंडुलकर सात पैकी सहा सामन्यात गोव्याकडून मैदानात उतरला. यावेळी त्याने संघासाठी ओपनिंग केली. तसेच गोलंदाजी केली. पण दोन्ही ठिकाणी त्याच्या पदरी निराशा पडली. त्याची ही कामगिरी पाहून लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीला घाम फुटला असेल हे मात्र नक्की.. कारण लखनौ सुपर जायंट्सने मोठ्या अपेक्षा ठेवून त्याला मुंबई इंडियन्सकडून ट्रेड केलं आहे. पण त्याची कामगिरी पाहता प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याची शंका आतापासूनच वाटू लागली आहे. चला जाणून घेऊयात विजय हजारे ट्रॉफीत त्याची कामगिरी कशी आहे ती…
अर्जुन तेंडुलकर विजय हजारे ट्रॉफीतील सहा डावात फलंदाजीला आला. यावेळी एकदाच नाबाद राहिला. पण त्याचा बॅटिंग सरासरी पाहता डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे. कारण त्याने 11.6 च्या सरासरीने फलंदाजी केली. तसेच एकूण 58 धावा केल्या आहे. वनडे फॉर्मेटमधील या स्पर्धेत अर्जुनचा स्ट्राईक रेट हा 60.41 चा आहे. या स्पर्धेत त्याला एकही षटकार मारता आलेला नाही. फक्त 7 चौकार मारले आहेत. गोलंदाजीतही काही खास करू शकलेला नाही. सहा सामन्यात त्याने एकच विकेट घेतली आहे. इतकंच काय तर 7.2च्या इकोनॉमी रेटने 326 धावा दिल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात फक्त एक विकेट मिळाली. ही विकेटही पृथ्वी शॉची होती.
गोवा संघाची वाईट स्थिती
गोवा संघाने विजय हजारे ट्रॉफीत क गटातून खेळत आहे. या गटात एकूण 8 संघ असून सहाव्या स्थानार आहे. गोव्याने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गोव्याने पहिल्या तीन सामन्यात सलग विजय मिळवला होता. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली आणि सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं. मुंबई, उत्तराखंड, पंजाब आणि महाराष्ट्राने पराभूत केलं आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत.
