
एशेज कसोटी मालिका गमवण्याचं सावट आता इंग्लंडवर असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमवून 371 धावा केल्या. इंग्लंडला या मालिकेत कमबॅक करायचं तर पहिल्या डावातील या धावांचा पल्ला गाठणं आवश्यक आहे. पण दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 8 गडी गमवून 213 धावा केल्या. अजूनही इंग्लंडचा संघ 158 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर खिंड लढवत आहे. बेन स्टोक्स नाबाद 45, तर जोफ्रा आर्चर नाबाद 30 धावांवर खेळत आहे. दोघांनी नवव्या विकेटसाठी 83 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडला या भागीदारीवर शेवटची आस आहे. या दोघांनी जर तिसऱ्या दिवशी तग धरला तर काही अंशी धावांचं अंतर कमी होऊ शकतं.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. झॅक क्राउलीच्या रुपाने पहिली विकेट 37 धावांवर पडली. त्यानंतर दोन विकेट धडाधड पडल्या. ओली पोप 3 आणि बेन डकेट 29 धावांवर बाद झाला. जो रूटही खाही खास करू शकला नाही. त्याने 31 चेंडूत 19 धावा केल्या आणि पॅट कमिन्स गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. हॅरी ब्रूक आणइ बेन स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षा भंग झाला. हॅरी ब्रूक 63 चेंडूत 45 धावा करून तंबूत परतला. जेमी स्मिथने बेन स्टोक्सला थोडी फार साथ दिली आणि 32 धावांची भागीदारी केली. पण 22 धावांवर असताना जेमी स्मिथ बाद होत तंबूत परतला.
विल जॅक्स 6 आणि ब्रायडन कार्सला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या दिवशीच तंबूत परततो की काय असं वाटत होतं. पण बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरची जोडी जमली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने भेदक गोलंदाजी केली. त्याने 3 विकेट काढल्या. तर स्कॉट बोलँड आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर कॅमरून ग्रीनच्या खात्यात एक विकेट गेली.