Ashes 2025 : पिंक बॉल टेस्टमध्ये पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर, जो रूटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं
एशेज कसोटी मालिकेत दुसरा कसोटी सामना गाबामध्ये सुरु आहे. दुसरा कसोटी सामना गुलाबी चेंडूने अर्थान डे नाईट खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला.

एशेज कसोटी मालिकेत पिंक बॉल सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 74 षटकांचा खेळ झाला आणि इंग्लंडने 9 गडी गमवून 325 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड पहिल्या दिवशी तरी मजबूत स्थितीत दिसत आहे. इंग्लंडकडून झॅक क्राउली आणि जो रूट यांनी सावध आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. झॅक क्राउलीच्या 76 धावा आणि पहिल्या दिवशी जो रूटच्या नाबाद 135 धावांच्या जोरावर 325 धावांपर्यंत मजल मारता आली. मधल्या फळीत धडाधड विकेट पडल्यानंतर जो रूट आणि जोफ्रा आर्चरने शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवलं. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी नाबाद 61 धावांची भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवशी या जोडीने आणखी काळ तग धरला तर आरामात 100ची भागीदारी होऊ शकते. खरं तर शेवटची विकेट घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागलाा. पण विकेट काय हाती लागली नाही.
नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. खरं तर इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. बेन डकेट आणि ओली पोप हे दोघेही स्वस्तात बाद झाले. या दोघाना खातं खोलता आलं नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला होता. झॅक क्राउली आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी मैदानात जम बसवला. दोघांनी 152 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली. झॅक क्राउली 76 धावा करून बाद झाला. त्यानंतरही एका बाजून जो रूट खिंड लढवत राहिला. हॅरी ब्रूक 31, बेन स्टोक्स 19, जेमी स्मिथ 0, विल जॅक्स 19, गस एटकिनसन 4, ब्रायडन कार्स 0 असे झटपट गडी बाद झाले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. त्याने 19 षटकात 71 धावा देत 6 गडी बाद केले. तर मायकल नेसेर आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर ब्रेंडन डॉगेट आणि कमरून ग्रीन यांना काही विकेट मिळाली नाही. इंग्लंडसाठी दुसरा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तर मालिकेवरील पकड सैल होईल याची जाणीव आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न आहे.
