
इंग्लंड क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची प्रतिष्ठेची एशेस सीरिज खेळवण्यात येत आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्याच दिवशी 8 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंड दुसऱ्या कसोटीत पहिल्या पराभवाची परतफेड करत मालिकेत बरोबरी करण्यासाठी उतरणार आहे. दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा इथे होणार आहे. या सामन्याच्या 48 तासांआधीच इंग्लंड क्रिकेट टीमने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. उभयंसघातील हा सामना 4 डिसेंबरपासून होणार आहे.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. मार्क वूड याला दुखापतीमुळे या दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाहीय. त्यामुळे वूडच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करण्यात आला आहे. जॅक्सचं यासह 3 वर्षांनंतर कसोटी संघात कमबॅक झालं आहे. जॅक्सने त्याचा अखेरचा कसोटी सामना जवळपास 3 वर्षांआधीच खेळला होता. जॅक्सने डिसेंबर 2022 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. जॅक्सने इंग्लंडसाठी आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच 6 विकेट्सही घेतल्या आहेत. आता जॅक्स 3 वर्षांनंतर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या डावात 172 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 140 धावांआधीच रोखलं. इंग्लंडने यजमानांना 132 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे इंग्लंडला 40 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. इंग्लंडने 40 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात 164 रन्स केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 205 धावांचं आव्हान मिळालं.
ऑस्ट्रेलियाने विजयी धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक योगदान दिलं. हेडने 123 धावा केल्या. तर जॅक वेदरल्ड याने 23 धावांचं योगदान दिलं. तर मार्नस लबुशेन आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. लबुशेनने 51 आणि स्मिथने 2 धावा केल्या.
इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज
📋 We’ve made one change to our XI for the second Test…
Enter stage right, Will Jacks 👊
— England Cricket (@englandcricket) December 2, 2025
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), विल जॅक्स, गस एटकीन्सन, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.