
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झाली. भारताने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर काही सामन्यांचा अपवाद वगळता उर्वरित महिना हा सामन्यांबाबत कोरडाच गेला. इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा एकही सामना नियोजित नव्हता. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले होते. चाहत्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतिक्षा अखेर काही तासांनी संपणार आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी काही तासांचा अवधीच बाकी आहे. ही स्पर्धा एकूण 20 दिवस होणार आहे. दुबई आणि अबुधाबीत या स्पर्धेतील सर्व सामने होणार आहेत. एकूण 8 संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोणते 2 संघ आमनेसामने असणार? हा सामना कुठे होणार आणि किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
आशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आहे. अनुभवी ऑलराउंडर राशिद खान हा अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर यासिम मुर्तजा हाँगकाँगचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत पूर्ण माहिती जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना मंगळवारी 9 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान या सामन्यात हाँगकाँगचा उपकर्णधार बाबर हयात याच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. बाबर हयात टी 20 आशिया कप स्पर्धेत शतक करणारा पहिला तर एकूण दुसरा फलंदाज आहे. बाबरने 2016 साली पहिल्याच टी 20 आशिया कप स्पर्धेत शतक ठोकलं होतं. त्यामुळे बाबर हयात अफगाणिस्तान विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणँ औत्सुक्याचं ठरणार आहे.