Asia Cup 2025 : संजू सॅमसनला आशिया कपसाठी टीम इंडियात नो एन्ट्री! अभिषेकसोबत ओपनिंग कोण करणार?
Asia Cup 2025 Team India Sanju Samson : संजू सॅमसन याने एका वर्षात टी 20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र संजूने गेल्या 5 टी 20I सामन्यांमध्ये फक्त 51 धावाच करता आल्या आहेत.

आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने 26 जुलै रोजी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार यूएईतील एकूण 2 स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. गतविजेत्या भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेसाठी घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा आणि उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ता यांनी मोठं विधान केलं आहे. त्यानुसार भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार नाही.
संजू सॅमसन टी 20i क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. भारतासाठी वर्षभरात टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान हा संजूच्या नावावर आहे. मात्र वाईट बाब अशी की संजूला गेल्या 5 टी 20i सामन्यांमध्ये 60 धावाही करता आल्या नाहीत. संजूने शेवटच्या 5 टी 20i सामन्यांमध्ये 51 धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूला संघात संधी देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दीप दासगुप्ता काय म्हणाले?
“संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केली. मात्र भारतात इंग्लंड विरुद्ध त्याला फार संघर्ष करावा लागला. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात कोणत्याही एका मजबूत संघाविरुद्ध खेळलेली ही एकमेव मालिका होती”, असं दीप दासगुप्ता टीओआयसोबत बोलताना म्हणाले.
“शुबमन गिल विराट कोहली याची भूमिका बजावू शकतो. शुबमन या अशा स्पर्धेत शेवटपर्यंत खेळून मोठी धावसंख्या करु शकतो. शुबमनला आयपीएलमधील कामगिरीची पार्श्वभूमी आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीत असा खेळाडू असायला हवाच” , असंही दासगुप्ता यांनी म्हटलं.
“अभिषेक शर्मा याने ओपनर म्हणून खेळावं. अभिषेकमध्ये सूर गवसल्यावर सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. यशस्वी जैस्वालला संधी मिळणं अवघड आहे. त्यामुळे निवड समितीला संजू सॅमसन आणि जितेश शर्मा मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतात की नाही, हे ठरवावं लागेल”, असंही दासगुप्ता यांनी नमूद केलं.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर.
