IND vs PAK : सुपर 4 फेरीत हँडशेक होणार की नाही? सूर्यकुमार यादवने दिलं असं उत्तर
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पु्न्हा आमनेसामने येणार आहेत. 21 सप्टेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाची भूमिका काय असेल? याकडे लक्ष लागून आहे. हँडशेक करणार की नाही? यावर सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने तिन्ही सामने जिंकले आणि सुपर 4 फेरी गाठली आहे. या फेरीत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना 14 सप्टेंबरला झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून धूळ चारली होती. आता सुपर 4 फेरीसाठी भारतीय संघ पुन्हा सज्ज आहे. पण भारतीय संघ या सामन्यात हँडशेक करणार की नाही? हा प्रश्न आहे. कारण पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारताची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला समोरं गेला. तेव्हा त्याला हँडशेक करणार की नाही असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं.
सूर्यकुमार यादवने हँडशेक प्रकरणावर हसत म्हणणं मांडलं की, ‘तुम्ही कोणत्या प्रकरणाची गोष्ट करत आहात? तुम्ही चेंडूसह आमच्या कामगिरीबाबत बोलत आहात का? फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चांगली स्पर्धा आहे. पूर्ण स्टेडियम क्षमतेने भरलेलं आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची सर्वोत्कृष्ट कामगिरी करा आणि आपल्या देशासाठी सर्वश्रेष्ठ द्या.’ सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं की, आमच्या संघावर पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा फार काही दबाव नाही. कारण आमचं लक्ष पूर्णपणे प्रक्रिया आणि योग्य कामगिरी करण्यावर आहे. खेळाडूंना स्पष्ट संदेश आहे की, बाहेर जे काही सुरु आहे त्याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रीत करा.
साखळी फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पूर्णपणे दुर्लक्षित केलं होतं. नाणेफेकीवेळी हात मिळवला नाही. त्यानंतर सामना संपल्यानंतरही तसंच केलं. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज गेली होती. त्यामुळे पाकिस्तानने या प्रकरणासाठी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने त्यांचं म्हणणं काही ऐकलं नाही. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होत आहे आणि अँडी पायक्रॉफ्टच सामनाधिकारी असणार आहेत.
