भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मैदानात जाण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी, नाही तर….
भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. अशी सर्व स्थिती असताना सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच काही सूचनाही दिल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. देशभरात या सामन्यावरून विरोध होत आहे. दुसरीकडे, या समन्याची सर्व तिकीटे विकली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सामन्यात मैदान खचाखच भरलेलं असेल यात काही शंका नाही. पण भारत पाकिस्तान सामना मैदानात जाऊन पाहण्यापूर्वी काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना हा सामना पाहण्यासाठी मैदानात झेंडा किंवा पोस्टर घेऊन जाण्याची परवानगी नाही. कारण सध्याचं वातावरण पाहता मैदानात काहीही होऊ शकतं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कोणतीही जोखिम पत्कारण्यास तयार नाहीत. स्टेडियमच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इतकंच काय तर अतिरिक्त पोलिसांची कुमक मैदानाच्या आसपास वाढवली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी बंदोबस्त कसा ठेवला आहे याचा अंदाज बांधता येईल. इतकंच काय तर मीडियासाठी कठोर नियमावली आखण्यात आली आहे. काही गोष्टी करण्यास मनाई केली आहे. त्याचं उल्लंघन केल्यास मान्यता रद्द केली जाईल.
दुबई पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा पालन केलं नाही तर मोठा दंड भरावा लागेल. इतकंच काय तर तुरुंगातही जाण्याची वेळ येऊ शकते. 5 ते 30 हजार दिरहॅमपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच 1 ते 3 महिन्यांपर्यंत हद्दपार किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी मैदानाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिकाने न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, ‘दुबई ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्थळ आहे. येथे हायप्रोफाईल कार्यक्रमाचं योजन केलं आहे. प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूची सुरक्षा करणं आमचं कर्तव्य आहे. यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आम्हाला माहिती आहे की, परिस्थिती सामान्य नाही आणि म्हणूनच सर्व खबरदारी घेतली जात आहे.‘
गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तान सामने अनेकदा झाले आहेत. पण यंदा वातावरण काही वेगळं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तान सामने तर दुरची गोष्ट आहे. असं असताना भारतीय संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळतो. पण या सामन्यापूर्वी खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफही संभ्रमात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतीय संघावर अतिरिक्त दबाव असणार यात काही शंका नाही.
