
आशिया कप 2025 स्पर्धेतील बहुतांश सामन्यात भारताला पहिल्या डावात बॅटिंगची फार संधी मिळाली नाही. त्यामुळे चाहते टीम इंडियाच्या फलंदाजांची फटकेबाजी कधी पाहायला मिळणार यासाठी उत्सूक होते. बांगलादेशने सुपर 4 मधील चौथ्या सामन्यात टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे चाहत्यांना फटकेबाजी पाहायला मिळणार, अशी आशा होती. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताला स्फोटक सुरुवात करुन दिली. सलामी जोडीने पावर प्लेमध्ये पैसावसूल बॅटिंग केली. त्यामुळे या सामन्यात भारताकडून चाहत्यांना 200 पेक्षा अधिक धावा अपेक्षित होत्या. मात्र तसं झालं नाही. बांगलादेशने टीम इंडियाला निर्णायक क्षणी झटपट झटके दिले आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे बांगलादेशला सुपर 4 फेरीत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी 169 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता बांगलादेश हे आव्हान पूर्ण करत भारताचा विजय रथ रोखणार की टीम इंडिया सलग पाचवा सामना जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारताला चाबूक सुरुवात करुन दिली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. मात्र शुबमनच्या तुलनेत अभिषेकने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. मात्र सातव्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर बांगलादेशने डोकेदुखी ठरत असलेली ही सेट जोडी फोडली. शुबमन गिल 19 बॉलमध्ये 29 रन्स करुन आऊट झाला.
बांगलादेशने त्यानंतर नवव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर भारताला एकूण दुसरा झटका दिला. शिवम दुबे 2 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर अभिषेकने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 29 रन्स जोडल्या. या जोडीला मोठी भागदारी करण्याची संधी होती. मात्र भारताने तिसरी विकेट गमावली. बांगलादेशने कडक फिल्डिंगच्या जोरावर अभिषेक शर्मा याला रनआऊट केला. अभिषेकने भारतासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. अभिषेकने 37 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह 75 रन्स केल्या.
बांगलादेशने अभिषेकनंतर टीम इंडियाला ठराविक अंतराने 2 झटके दिले. कॅप्टन सूर्यकुमार यादव पाकिस्ताननंतर या सामन्यातही अपयशी ठरला. सूर्या 5 रन्सवर कॅच आऊट झाला. तर तिलक वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. तिलकने सूर्याप्रमाणे 5 धावा केल्या.
त्यानंतर अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर हार्दिक 38 रन्स करुन माघारी परतला. हार्दिक आऊट होताच 20 ओव्हरचा खेळ आटोपला. बांगलादेशने अशाप्रकारे टीम इंडियाला ठराविक अंतराने एकूण 6 झटके देत 168 धावांवर यशस्वीरित्या रोखलं. बांगलादेशसाठी रिशाद हौसेन याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर तंझिम साकिब, मुस्तफिजुर आणि सैफुद्दीन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.