AUS vs ENG : मालिका गमावली मात्र कांगारुंचा माज उतरवला, ऑस्ट्रेलियात 14 वर्षांनी विजयी, कॅप्टन बेन स्टोक्स काय म्हणाला?

Ben Stokes Post Match Presentation Ashes Series 2025 : इंग्लंडने मालिका गमावली मात्र कमबॅक काय असतं आणि कसं करायचं असतं ते दाखवून दिलं. इंग्लंडने कांगारुंचा चौथ्या कसोटीत दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडव विजय मिळवला.

AUS vs ENG : मालिका गमावली मात्र कांगारुंचा माज उतरवला, ऑस्ट्रेलियात 14 वर्षांनी विजयी, कॅप्टन बेन स्टोक्स काय म्हणाला?
England Ben Stokes
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 27, 2025 | 5:03 PM

इंग्लंडने सलग 3 सामन्यांसह प्रतिष्ठेची एशेज सीरिज गमावली. इंग्लंडला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. एका बाजूला ऑस्ट्रेलियाने सलग 3 सामने जिंकून एशेज सीरिज जिंकण्याची मालिका कायम ठेवण्यात यश मिळवलं. तर इंग्लंडवर सडकून टीका करण्यात येत होती. त्यामुळे इंग्लंडसाठी चौथा सामना हा प्रतिष्ठेचा असा झाला होता. इंग्लंड मेलबर्नमधील चौथ्या आणि बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पूर्ण ताकदीने उतरली आणि जोरदार पलटवार केला. इंग्लंडने कांगारुंचा दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला आणि विजयाचं खातं उघडलं. इंग्लंडने हा सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला.

इंग्लंडने मालिका गमावली असली तर त्यांच्यासाठी हा विजय विश्वास वाढवणारा ठरला आहे. इंग्लंडने यासह ऑस्ट्रेलियातील 14 वर्षांची प्रतिक्षा संपवली. इंग्लंडचा हा ऑस्ट्रेलियामधील 14 वर्षांनंतरचा पहिला विजय ठरला. बेन स्टोक्स याने त्याच्या नेतृत्वात इंग्लंडला हा अविस्मरणीय विजय मिळवून दिला. स्टोक्सने या सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. स्टोक्सने या विजयानंतर चांगलं वाटतंय असं म्हटलं. तसेच खेळाडूंनी फार मेहनत घेतली असंही स्टोक्सने म्हटंलं.

बेन स्टोक्स काय म्हणाला?

“जिंकल्यानंतर खरंच चांगलं वाटतंय. सर्वांनी विजयासाठी फार मेहनत घेतली. हा विजय फार खास आहे. आम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर इतरांसाठी खेळतो. जगभरात आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला समर्थन मिळतं. आमच्यासाठी चाहत्यांकडून घोषणाबाजी केली जाते. आम्ही हे सर्व ऐकत असतो. आमचे सर्व चाहते फार उत्साहित असतील हे मला माहितीय”, असं म्हणत स्टोक्सने विजयानंतरच्या भावना व्यक्त केल्या. तसेच चाहत्यांचे आभार मानले.

“या सामन्याआधी खूप काही घडलं. मात्र मुलांनी (सहकाऱ्यांनी)मैदानात उतरून, लक्ष केंद्रीत करुन जो खेळ दाखवला ते टीमबाबत खूप काही सांगून जातो”, असं स्टोक्सने नमूद केलं.

तसेच स्टोक्सने सपोर्ट स्टाफलाही या विजयाचं श्रेय दिलं. “खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅनेजमेंटलाही याचं श्रेय जातं. त्यांनी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं”, असं म्हणत स्टोक्सने त्यांच्या मेहनतीचंही कौतुक केलं.

चौथ्या सामन्यात काय झालं?

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 152 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक करत इंग्लंडला 110 रन्सवर गुंडाळलं. त्यामुळे कांगारुंना 42 धावांनी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलिया टीमने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंग्लंडसमोर 175 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडने हे आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि मालिकेतील पहिला विजय मिळवला.