AUS vs IND : केएल-अक्षरची निर्णायक खेळी, भारताच्या 136 धावा, मात्र ऑस्ट्रेलियाला 131 रन्सचं टार्गेट, असं कसं?
Australia vs India 1st ODI 1st Innings : टीम इंडियाने पर्थमध्ये 26 ओव्हरमध्ये 136 रन्स केल्या. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला 131 धावांचं आव्हान कसं काय मिळालं? जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थमधील पहिला एकदिवसीय सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे 26 षटकांचा करण्यात आला. टीम इंडियाने या 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 136 रन्स केल्या. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या तुलनेत 5 पेक्षा कमी धावांचं आव्हान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पूर्ण करण्यापासून रोखणार की यजमान शुबमनसेनेला पराभूत करत विजयी सलामी देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाचे चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहली या माजी कर्णधारांची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सूक होते. मात्र या दोघांनी निराशा केली. रोहित 13 बॉलमध्ये 8 रन्स करुन खेळत होता. मात्र 14 व्या बॉलवर रोहित जोश हेझलवूडच्या बॉलिंगवर रेनशॉच्या हाती कॅच आऊट झाला. रोहितनंतर विराट मैदानात आला.
विराट कोहली डक
रोहितला फार काही करता न आल्याने चाहत्यांना विराटकडून मोठ्या खेळीची आशा होती. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.त्यामुळे विराटकडून या सामन्यात शतकाची अपेक्षा होती. मात्र विराटला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. रोहित-विराट आऊट झाल्याने चाहते निराश होते. कॅप्टन शुबमन गिल याने त्यात आणखी भर घातली. शुबमन 10 धावांवर आऊट झाला.
अक्षर-केएलची निर्णायक खेळी
त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 20 रन्स जोडल्या. त्यानंतर श्रेयस 11 रन्स करुन आऊट झाला. अक्षर आणि केएल या जोडीने पाचव्या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशीप केली. अक्षर 31 रन्स करुन आऊट झाला. अक्षरने या खेळीत 3 चौकार लगावले. वॉशिंग्टन सुंदरने 10 चेंडूत 10 धावा केल्या.
केएल राहुल याने एक बाजून लावून धरली होती. त्यामुळे केएलकडून मोठी खेळी अपेक्षित होती. मात्र केएल निर्णायक क्षणी आऊट झाला. केएलने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. केएलने 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 38 रन्स केल्या. तर अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी याने मोहम्मद सिराज याच्या सोबतीने निर्णायक धावा जोडल्या. नितीशने 11 बॉलमध्ये 2 सिक्ससह नॉट आऊट 19 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 136 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियासाठी एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मॅथ्यू शॉर्ट याचा अपवाद वगळता इतर सर्वांनी विकेट घेतली. जोश हेझलवूड, मिचेल ओवेन आणि एम कुहनमेन या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल स्टार्क आणि नॅथन एलिस या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
