
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावली. शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच एकदिवसीय मालिकेत भारताला विजयी करण्यात अपयशी ठरला. यजमान ऑस्ट्रेलियाने सलग 2 सामन्यांमध्ये भारतावर मात करत मालिका आपल्या नावावर केली. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने लाज राखत मालिकेचा शेवट विजयाने केली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i मालिकेसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात भारताचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श वनडेनंतर टी 20i सीरिजमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. या मैदानात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या शेवटच्या 10 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन्ही संघांचा एका सामन्यात पराभव झालाय. भारताचा एक सामना बरोबरीत राहिला. तर ऑस्ट्रेलियाचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही संघात टी 20i सीरिजमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार हे आकडेवारीवरुनच सिद्ध होतं.
भारताने मानुका ओव्हलमध्ये आतापर्यंत एकूण 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 4 मध्ये 3 वनडे आणि 1 टी 20i मॅचचा समावेश आहे. भारताने यापैकी 2 सामने जिंकले आहेत. भारताने या मैदानात पहिला आणि शेवटचा टी 20 सामना हा 2020 साली खेळला होता. भारताने हा सामना जिंकला होता.
आतापर्यंत मानुका ओव्हलमध्ये एकूण 22 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 10 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 9 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत 32 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 20 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 11 वेळा भारताला पराभूत केलं आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. तसेच 12 टी 20i सामने हे ऑस्ट्रेलियात झाले आहेत. भारताने या 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर फक्त 4 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.