IND vs AUS: भारताचे 8 खेळाडू ऑस्ट्रेलियात डेब्यूसाठी सज्ज, कोण आहेत ते?
Australia vs India T20i Series 2025 : भारताला एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. त्यानंतर आता टीम इंडिया टी 20I सीरिजसाठी सज्ज झालीय.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेला बुधवार 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. सूर्याची कॅप्टन म्हणून आणि शुबमनची उपकर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशात भारताचे 8 खेळाडू हे ऑस्ट्रेलियात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. या 8 खेळाडूंनी याआधी एकदाही ऑस्ट्रेलियात टी 20i सामना खेळलेला नाही. ते कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
अभिषेक शर्मा, जितेश शर्मा, शुबमन गिल, शिवम दुबे, रिंकु सिंह, नितीश कुमार रेड्डी, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा हे 8 खेळाडू ऑस्ट्रेलियात कारकीर्दीतील पहिला टी 20i सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार रेड्डी याने अवघ्या काही महिन्यांपूर्वीच टी 20i पदार्पण केलं आहे. मात्र या 8 जणांमध्ये असेही काही खेळाडू आहेत जे गेल्या 4-5 वर्षांपासून खेळत आहेत. वनडे आणि टेस्ट टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल यानेही ऑस्ट्रेलियात टी 20i डेब्यू केलेला नाही. तसेच रिंकु सिंग, हर्षित राणा अभिषेक शर्मा हे तिघेही ऑस्ट्रेलियात पदार्पणासाठी सज्ज आहेत.
तसेच जितेश शर्मा, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनीही वयाची तिशी ओलांडली आहे. या तिघांना संधी मिळाल्यास त्यांचं ऑस्ट्रेलियात टी 20 पदार्पण होईल. तसेच अभिषेक शर्मा, शुबमन गिल, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या चौघांना पहिल्याच सामन्यात संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर वरचढ
दरम्यान टीम इंडियाच्या गोटात 8 खेळाडूंना ऑस्ट्रेलियात टी 20i सामने खेळण्याचा अनुभव नाही. मात्र असं असलं तरी टीम इंडिया ऑस्ट्रेलियातही कांगारुंवर वरचढ राहिली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाl टी 20i सीरिजमध्ये अजिंक्य आहे. भारताने ऑस्ट्रेलियात टी 20i मालिका गमावलेली नाही. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 4 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. त्यापैकी भारताने 2 मालिका जिंकल्या आहेत. तर 2 मालिका बरोबरीत सोडवल्या आहेत.
विशेष म्हणजे भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या गेल्या 3 टी 20i मालिका जिंकल्या आहेत. तर यंदाची उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत कोणता संघ विजयाने सुरुवात करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
