WTC 2025 : इंग्लंडचा पराभव आणि गुणतालिकेत उलथापालथ, भारत दक्षिण अफ्रिकेवर असा परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर प्रत्येक सामन्यानंतर फरक पडतो. नुकताच ऑस्ट्रेलिया इंग्लंड सामना पार पडला. या सामन्यातील निकालाचा परिणाम गुणतालिकेवर झाला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात...

WTC 2025 : इंग्लंडचा पराभव आणि गुणतालिकेत उलथापालथ, भारत दक्षिण अफ्रिकेवर असा परिणाम
WTC 2025 : इंग्लंडचा पराभव आणि गुणतालिकेत उलथापालथ, भारत दक्षिण अफ्रिकेवर असा परिणाम
Image Credit source: BCCI/England Cricket Twitter
Updated on: Nov 22, 2025 | 8:48 PM

एशेज मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. या सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर खेळपट्टी पाहता 205 धावा गाठणं कठीण होतं. पण ट्रेव्हिस हेडच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर होता. आताही त्याच स्थानावर आहे. पण विजयी टक्केवारी मात्र कमालीची घटली आहे.

इंग्लंडची सामन्यापूर्वी विजयी टक्केवारी 43.33 टक्के होती. आता ती 36.11 वर घसरली आहे. इंग्लंडने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात पराभव, दोन सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्या विजय मिळवल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. त्यामुळे पहिलं स्थान अबाधित आहे.

भारत दक्षिण अफ्रिका विजयी टक्केवारी

श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका 66.67 विजयी टक्वेवारीसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारतीय सघ 54.17 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. पहिला कसोटी सामना गमावल्याने भारताची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालावर पुढचं गणित अवलंबून आहे. भारताने हा सामना जिंकला तर पुन्हा तिसऱ्या स्थानावर विराजमान होईल. भारताची विजयी टक्केवारी 59.26 होईल. तर दक्षिण अफ्रिका 50 टक्क्यांसह पाकिस्तानसोबत चौथ्या क्रमांकावर राहील.

भारत दक्षिण अफ्रिका सामना ड्रॉ झाला तर दक्षिण अफ्रिका तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानी राहील. पण दक्षिण अफ्रिका आणि भारताच्या विजयी टक्केवारीत घट होईल. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 58.33 आणि भारताची विजयी टक्केवारी 51.85 टक्के राहील. जर हा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला. तर दक्षिण अफ्रिकेला जबरदस्त फायदा होईल. दक्षिण अफ्रिका 75 टक्क्यांसह दुसर्‍या स्थानावर विराजमान होईल. तर भारताची घसरण पाचव्या स्थानी होईल. भारताची विजयी टक्केवारी 48.15 राहील.