सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं

ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवण्याचा पराक्रम करणाऱ्या टीम इंडियाने केला आहे.

सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं

ब्रिस्बेन : टीम इंडियाने थरारक झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने (Aus vs Ind 4th Test) शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही (Border Gavaskar Trophy) जिंकली. टीम इंडियाने हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे रहाणेने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या आणि युवा खेळाडूंना सोबत घेत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या युवासेनेने कांगारुंना फलंदाजी आणि गोलंदाजीने चांगलंच रडवलं. या सामन्याच्या प्रत्येक सत्रात एखादा भारतीय खेळाडू हिरो ठरला. (AUSvsIND Brisbane Test : 5 reasons of india’s victory at Gabba)

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन या तिघांनी प्रत्येकी तीन विकेट घेत कांगारुंना 369 धावांमध्ये अडवलं. तर टीम इंडियाच्या पहिल्या डावात सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर शार्दुल ठाकूर (67) आणि वॉशिंग्टन सुंदर (62) या दोघांनी शतकी भागिदारी करत सामन्यातील भारताचं आव्हान जिवंत ठेवलं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी कसलेली गोलंदाजी करत कांगारुंना 294 धावांत रोखलं. यावेळी मोहम्मद सिराजने 5 त शार्दुल ठाकूरने 4 गडी बाद केले. तर भारताच्या दुसऱ्या डावात आणि भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेटकिपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तसेच भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानेही अर्धशतक झळकावत आपलं योगदान दिलं.

पंतचा तडाखा

ब्रिस्बेन कसोटी सामना रंगतदार स्थितीत असताना रिषभ पंतने (Rishabh Pant ) निर्णायक भूमिका बजावली. पंतने नाबाद 89 धावांची विजयी खेळी केली. पंतने आज चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदरसह महत्वपूर्ण भागदीरी केली. या दरम्यान त्याने अर्धशतकही लगावलं. एकाबाजूला टीम इंडियाचे शिलेदार बाद होऊन पव्हेलियनमध्ये परत होते, तर दुसरी बाजून पंतने लावून धरली होती. पंतने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. पंतने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. पंतने 138 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 89 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 400 च्या आत रोखलं

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला 369 धावांमध्ये रोखणं ही टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांची कामगिरी कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन या तिघांनी प्रत्येकी तीन विकेट घेत कांगारुंना जखडून ठेवलं होतं. सुंदर आणि नटराज त्यांच्या कारकीर्दीतला पहिलाच सामना खेळत होते तर शार्दुलचा हा दुसराच सामना होता. तरीदेखील या नव्या दमाच्या गोलंदाजांनी कांगारुंना शरणागती घ्यायला लावली.

भारताच्या पहिल्या डावात शार्दुल-सुंदरच्या जोडीसमोर कांगारु हतबल

टीम इंडियाच्या पहिल्या डावात सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर शार्दुल ठाकूर (67) आणि वॉशिंग्टन सुंदर (62) या दोघांनी शतकी भागिदारी करत सामन्यातील भारताचं आव्हान जिवंत ठेवलं. सुंदर-शार्दुल मैदानात येण्यापूर्वी टीम इंडियाची 6 बाद 186 अशी स्थिती झाली होती. मात्र नवख्या शार्दुल-सुंदर जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. दोघांनी आधी अर्धशतकी त्यानंतर शतकी भागादारी केली. या दोघांनी 59 धावांची भागीदारी करताच ब्रिस्बेनमधील 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोघांनी टीम इंडियाच्या मनोज प्रभाकर आणि कपिल देव या माजी क्रिकेटपटूंचा ब्रिस्बेनमधील रेकॉर्ड ब्रेक केला. प्रभाकर-देव या जोडीने ब्रिस्बेनमध्ये 7 व्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सिराज-शार्दुलची कसलेली गोलंदाजी

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 296 धावांवर रोखलं. यामुळे भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान मिळालं. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्याने कांगारुंच्या एकूण 5 फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह त्याने मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना बाद केलं. यामध्ये त्याने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांना बाद केलं. यासह सिराज हा ब्रिस्बेनवर टीम इंडियाकडून कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेणारा 5 वा गोलंदाज ठरला. सिराजसोबत पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या शार्दुलनेही जबरदस्त गोलंदाजी केली त्यानेदेखील या डावात 4 बळी मिळवले.

गिलने पाया रचला, तर पुजाराने संयमी खेळ करत भारताचं आव्हान जिवंत ठेवलं

भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारान यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला. सकाळी सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव सावरला. शुभमन गिलंने सामन्याच्या पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात त्याने 91 धावा चोपल्या. तर भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.

संबंधित बातम्या:

 इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, इशांतचं पुनरागमन, शार्दुल-सुंदरला संधी

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

Published On - 6:52 pm, Tue, 19 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI