भारत पाकिस्तान सामन्यावरून बीसीसीआयने हात झटकले, सरकारकडे बोट दाखवत कारण केलं स्पष्ट
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहे. पण या सामन्यावरून बराच वाद रंगला आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही सामना कसा खेळू शकतो? असे प्रश्न विचारले जात आहे. असं असताना बीसीसीआयने हात वर करत सरकारकडे बोट दाखवलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होत आहे. आशिया कप स्पर्धेत हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही संघ भिडणार असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पण एकीकडे, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले असताना हा सामना का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘Boycott of India-Pakistan Asia Cup Clash’ हा ट्रेंड सुरु आहे. असं असताना बीसीसीआयवर टीका होत आहे. आता बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आजतकशी बोलताना देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, ‘सामन्यासाठी बीसीसीआय सचिव म्हणून मी संघाला शुभेच्छा देतो. आम्हाला विश्वास आहे की विजयासाठी संघ पूर्ण ताकदीनिशी उतरेल. हा ज्या घटना आम्ही जास्त लक्षात ठेवू इच्छित नाही त्यांना हे योग्य उत्तर असेल. भारताला अशा देशासोबत खेळावे लागू शकते ज्यांच्याशी आमचे चांगले संबंध नाहीत. परंतु बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. म्हणूनच आम्ही या सामन्यांना नकार देऊ शकत नाही.’दुसरीकडे, भारत पाकिस्तान सामन्याचा विरोध होत आहे. विरोधकांनी भारत पाकिस्तान सामन्याचा मुद्दा हाती धरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही माजी क्रिकेटपटू आणि फॅन्सदेखील हा सामना होऊ नये, यासाठी आग्रही आहेत.
टी20 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 सामने झाले आहेत. यात भारताने 9 सामने, पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ तीनवेळा भिडले आहेत. यात भारताने दोन, तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं की, ‘जेव्हा एसीसी किंवा आयसीसी स्पर्धा असतात तेव्हा देशांना खेळणं अनिवार्य होते. त्यामुळे स्पर्धा सोडावी लागेल किंवा सामना गमावावा लागेल. इतकंच काय तर गुण दुसऱ्या संघाला मिळतील. भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही. आम्ही वर्षापूर्वीच ठरवले आहे की पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही. तोपर्यंत आम्ही द्विपक्षीय क्रिकेट खेळणार नाही.’
भारताने हा सामना खेळला नाही तर काय?
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फायदा होईल. पाकिस्तानविरुद्ध खेळलं नाही तर तो सामना गमावला असे मानले जाईल. यामुळे सामन्याचे फुकटचे 2 गुण पाकिस्तानला दिले जातील. भारतीय संघाला एकही गुण मिळणार नाही. सुपर 4 फेरीतही असेच होईल. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आणि भारत खेळला नाही तर पाकिस्तानला विजेता घोषित केले जाईल.
