बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचे खरे कारण दुखापत नाही तर…! बीसीसीआयने रोहित शर्माबाबतही घेतला मोठा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया जसप्रीत बुमराहशिवाय घोषित केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. पण आता वेगळंच कारण पुढे आलं आहे.

भारतीय संघात जसप्रीत बुमराहने आपलं एक वेगळं असं महत्त्व प्रस्थापित केलं आहे. बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने कधीही सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने आपल्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली आणि त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागलं. पण स्पर्धेत न खेळण्याचं वेगळंच कारण आता समोर आलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय जसप्रीत बुमराहकडे कसोटी कर्णधार म्हणून पाहात आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वात जसप्रीत बुमराहकडे संघाची सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवून कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात स्थान दिलं नसल्याचं बोललं जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघातील खेळाडूंवर शेवटची मोहोर लावण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठिच्या दुखापतीचं स्कॅनिंग केलं गेलं. एनसीएने स्कॅन रिपोर्ट पाहिल्यानंतर कोणतीही समस्या नसल्याचं स्पष्ट केलं. पण बुमराहने अजून गोलंदाजी सुरु केली नव्हती आणि फक्त एका आठवड्याचा अवधी शिल्लक होता. त्यामुळे एनसीएने चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवायचं की नाही याचा निर्णय मुख्य निवडकर्ते अजित आगरकर याच्यावर सोडला होता. अजित आगरकरने टीम इंडियाचं भविष्य विचार करून रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला. कारण जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. टीम मॅनेजमेंट त्याचा संघाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करत आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयने रोहित शर्माबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय एकीकडे जसप्रीत बुमराहचा कसोटी कर्णधार म्हणून विचार करत आहे. तर रोहित शर्माला कसोटी संघातून डच्चू देणार असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, जून जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसेल. म्हणजेच रोहित शर्माला कसोटी संघात स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माचं कसोटी करिअर संपल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे.
