ENG vs IND : टीम इंडियात पहिल्या टेस्टसाठी या खेळाडूची अचानक एन्ट्री, बीसीसीआयची मोठी घोषणा
India Tour Of England Tour 2025 : टीम इंडियाच्या गोटातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात कसोटी मालिकेआधी एका खेळाडूची अचानक एन्ट्री झाली आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा हेडिंग्ले, लीड्स येथे होणार आहे. शुबमन गिल या मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तसेच यजमान संघाच्या नेतृत्वाची धुरा ही ऑलराउंडर बेन स्टोक्स याच्या खांद्यावर आहे. टीम इंडियाने या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. पहिल्या सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात आता टीम इंडियात एका खेळाडूची अचानक एन्ट्री झाली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
हर्षित राणा याचा इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हर्षित राणा याच्याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता हर्षितला प्लेइंग ईलेव्हनमध्येही वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
हर्षितला कसोटी मालिकेसाठी मुख्य संघात स्थान मिळणार, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात होतं. अखेर तसंच झालंय. हर्षित टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याचा खास आणि मर्जीतील खेळाडू असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच हर्षितला भारतीय संघात संधी मिळाली, असंही म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनसार, इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात आल्या. तसेच इंडिया ए विरुद्ध सिनिअर टीम इंडिया यांच्यात इन्ट्रा स्क्वॉड मॅच खेळवण्यात आली. त्यानंतर इंडिया ए टीममधील खेळाडू मायदेशी परतण्यासाठी सज्ज झाले. मात्र हर्षितला भारतात जाण्याआधी थांबायला सांगितलं. त्यामुळेच हर्षित राणाला भारतीय संघात संधी मिळणार, हे निश्चित समजलं जात होतं. फक्त औपचारिकता बाकी होती. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे हर्षितचा पहिल्या समावेश करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता पहिल्या कसोटीसाठी 18 ऐवजी 19 सदस्यीय संघ झाला आहे.
हर्षित राणा याची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द
टीम इंडियाच्या 23 वर्षीय हर्षित राणा याने कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं आहे. हर्षित टीम इंडियासाठी 2 कसोटी, 5 वनडे आणि 1 टी 20i मॅच खेळला आहे. तसचे हर्षितने आयपीएलमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षितने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी देण्यात आली. हर्षितने आयपीएलमध्ये 33 सामने खेळले आहेत.
हर्षित राणाचा पहिल्या कसोटीसाठी समावेश
Squad Update:
Harshit Rana links up with Team India for first Test in Leeds.
Details 🔽 #TeamIndia | #ENGvINDhttps://t.co/Lv8xKZS2ZJ pic.twitter.com/dI3oygLOjH
— BCCI (@BCCI) June 18, 2025
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टेस्टसाठी सुधारित टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, हर्षित पटेल आणि कुलदीप यादव.
