World Cup 2023 | अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ तारखेला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार!
Icc World Cup 2023 | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

मुंबई | आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या क्रिकेटच्या महाकुंभासाठी अर्थात वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. तर इतर 8 संघांनी अजून घोषणा केलेली नाही. बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा करणार, हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याकडून विचारला जात आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. या आशिया कपसाठी 21 ऑगस्टला बीसीसीआय टीम इंडिया जाहीर करणार आहे. या आशिया कपसोबतच वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र महत्वाची बाब म्हणजे आशिया कपसाठी 17 सदस्यीय स्क्वॉड जाहीर केला जाणार आहे.
आयसीसी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्याची 5 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे बीसीसीआयला 5 सप्टेंबरपर्यंत टीम इंडियाच्या खेळाडूंची नावं द्यावी लागतील. मात्र 27 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या नावांमध्ये बदल करता येईल. म्हणजे टीममध्ये एखाद्याला काढून त्याच्या जागी दुसऱ्याला संधी देता येईल. मात्र तो बदल 27 सप्टेंबरपर्यंतच करता येईल.
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याआधी नवी दिल्लीत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक होणार आहे. यानंतर बीसीसीआय 21 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर करेल. बीसीसीआय या सोबतच वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करु शकते.
आशिया कपला केव्हापासून सुरुवात?
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार आहे तर टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा 2 सप्टेंबरला होणार आहे. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी हार्दिक पंड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याला ती जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
