
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत पहिले आणि सलग 3 सामने जिंकले. भारताने यासह मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात पहिला विजय मिळवत भारताला विजयी चौकारापासून रोखलं. न्यूझीलंडने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात चौथा सामना जिंकला. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात यजमान टीम इंडियाला 50 धावांनी पराभूत केलं. टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यांनंतर 3-1 ने आघाडीवर आहे. आता पाचवा आणि अंतिम सामना हा शनिवारी 31 जानेवारीला होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी न्यूझीलंड संघात अचानक एका युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
आयसीसीच्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला (T20i World Cup 2026) 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्याआधी न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी टीममध्ये मोठा बदल केला आहे. न्यूझीलंड संघात आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज बेन सियर्स याचा राखीव म्हणून समावेश केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटकडून सोशल मीडियाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
बेन सियर्स याच्या समावेशामुळे न्यूझीलंडची ताकद वाढली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य संघातून एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हाव लागलं तरच राखीवपैकी संधी मिळते. त्यामुळे सियर्सला तेव्हाच संधी मिळेल जेव्हा मुख्य संघातील खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालेला असेल.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्ने याला दुखापत झाली होती. मिल्नेच्या दुखापतीनंतर संघात काइल जेमिसन याचा समावेश करण्यात आला होता. त्यात आता बेनची एन्ट्री झाली आहे. बेन टी 20i वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड संघासह जोडला जाणार आहे.
बेन सियर्सची टीममध्ये एन्ट्री
Welcome back, Ben Sears!
Ben Sears will join the BLACKCAPS as travelling reserve for the ICC @T20WorldCup in India. Full story ➡️ https://t.co/Ursua6oBnw
📷 | @PhotosportNZ #T20WorldCup pic.twitter.com/65pXF650gJ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 29, 2026
दरम्यान बेन सियर्स याने आतापर्यंत न्यूझीलंडचं 22 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सियर्सने या दरम्यान एकूण 23 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच सियर्स न्यूझीलंडसाठी 4 एकदिवसीय आणि 1 कसोटी क्रिकेट सामनाही खेळला आहे. सियर्सने वनडेत 10 आणि कसोटीत 5 विकेट्स घेतल्या आहेत.