Asia Cup 2025 : मिशन आशिया कप, बीसीसीआय निवड समिती भारतीय संघाची घोषणा केव्हा करणार? मोठी अपडेट समोर
Team India Squad For Asia Cup 2025 : भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने फेब्रुवारी महिन्यानंतर टी 20i क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे

भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला. शुबमन गिल याची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होती.त्यानंतर भारताने चौथा सामना अनिर्णित सोडवला. त्यानंतर भारताने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर आता टीम इंडियातील खेळाडू विश्रांतीवर आहे. भारतीय संघ आता आशिया कप 2025 स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेचे वेध लागले आहेत. गतविजेता भारतीय संघासमोर आशिया कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न निवड समितीची असणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याबाबतची अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघ केव्हा जाहीर केला जाणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट महिन्यातील चौथ्या आठवड्यात आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात येऊ शकतो. निवड समितीची मुंबईत बैठक होणार आहे. बीसीसीआयकडून या बैठकीबाबतची माहिती निवड समितीतील सर्व सदस्यांना देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. सूर्याचं या निमित्ताने थेट आयपीएलनंतर मैदनात कमबॅक होणार आहे. सूर्यावर विदेशात काही दिवसांपूर्वी दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी 20i संघात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांचं कमबॅक होऊ शकतं. ही जोडी गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20i टीममधून बाहेर आहे. तसेच शुबमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.
भारताच्या सामन्यांचं वेळापत्रक
पहिला सामना, विरुद्ध यूएई, 10 सप्टेंबर
दुसरा सामना, विरुद्ध पाकिस्तान, 14 सप्टेंबर
तिसरा सामना, विरुद्ध ओमान, 19 सप्टेंबर
दरम्यान या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. टीम इंडिया या तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरूद्ध खेळण्यासाठी तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धचा सामना होणार की नाही? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
