रोहित शर्माला रणजी ट्रॉफीसाठी संघात मिळालं स्थान, अचानक असं का झालं? जाणून घ्या
टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा झाली आहे. वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड झाली आहे. रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. असं असताना रोहित शर्माचं नाव रणजी संघात आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भारतीय संघांची बांधणी करत असताना गेल्या काही दिवसात बरंच काही घडताना दिसत आहे. वनडे क्रिकेटमध्ये भविष्याचा वेध घेत शुबमन गिलकडे जबाबदारी सोपवली आहे. दुसरं या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान दिलं आहे. आता दोघेही फलंदाज म्हणून संघात असणार आहेत. 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. असं असताना रणजी संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून रणजी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जम्मू काश्मीर संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात रोहित शर्माची निवड झाली आहे. रोहित शर्माचं नाव वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबईचा पहिलाच सामना जम्मू काश्मीरसोबत होणार आहे. त्यात जम्मू काश्मीर संघात रोहित शर्माचं नाव पाहून संभ्रम निर्माण झाला आहे. रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळणार यावर अनेकांना विश्वासच बसत नाही. पण या बातमी मागचं सत्य समोर आलं आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याचं नाव रणजी संघात असणं आश्चर्यकारकच आहे. पण हा रोहित शर्मा भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज नाही तर जम्मू काश्मीरचा गोलंदाज आहे. नाव साधर्म्य असल्याने हा गोंधळ झाला आहे. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज हा 30 वर्षांचा असून त्याने 2015 मध्ये जम्मू काश्मीर संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर जम्मू काश्मीर संघासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. रोहित शर्मासोबत जम्मू आणि काश्मीर संघात आकिब नबी, उमर नझीर आणि उमरान मलिक यांच्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे. मागच्या पर्वात जम्मू आणि काश्मीर संघाने मुंबईविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती.
भारतीय संघात सध्या फलंदाज म्हणून निवड झालेला रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतो. कारण आता तो फक्त वनडे फॉर्मेट खेळणार आहे. त्यात भारताचे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत फार काही सामने होणार नाहीत. त्यामुळे त्याला वनडे संघात स्थान कायम ठेवायचं असेल तर विजय हजारे ट्रॉफी खेळण्याशिवाय पर्याय नाही. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसू शकतो. त्यामुळे या दोन मालिका त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहेत. यात फॉर्म चांगला राहिला नाही तर पुढे खूपच कठीण होणार आहे.
