6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणाऱ्या युवराज सिंहला कधीच क्रिकेटर व्हायचं नव्हतं; तर’हा’ खेळ आवडायचा
Cricketer Yuvraj Singh Birthday : युवराज सिंह याचा आज 42 वा वाढदिवस आहे. युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. क्रिकेटच्या विश्वात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या युवराजला सुरुवातीला क्रिकेट आवडत नसे. मग युवराजला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? वाचा सविस्तर...

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : युवराज सिंह… क्रिकेटमधील सिक्सचा बादशाह… युवराजचं नाव जरी घेतलं तरी मॅचमधील थरार डोळ्यासमोर उभा राहतो. आता भारतीय संघ हारणार, असं वाटत असतानाच मॅच पलटण्याची धमक ठेवणारा हा क्रिकेटपटू… सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारण्याचा विक्रम करणारा खेळाडू. भारतीय संघाच्या मॅच जिंकण्यात युवराजचा मोठा वाटा राहिला. याच दिग्गज क्रिकेटपटूचा आज वाढदिवस आहे. युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण खरं तर सुरुवातीच्या काळात युवराजला क्रिकेट आवडत नव्हतं. तर त्याला दुसऱ्याच खेळात रस होता.
युवराजला ‘हा’ खेळ आवडायचा
ज्या युवराज सिंहने क्रिकेटच्या जगात जगभर नाव कमावलं त्याच युवराजला त्याच्या सुरुवातीच्या काळात क्रिकेटची विशेष आवड नव्हती. युवराजला स्केटिंग खेळायला आवडायचं. स्केटिंग करताना युवराज त्यात मग्न व्हायचा. या सगळ्या बद्दल युवराजने एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने स्केटिंगच्या आवडीबद्दल भाष्य केलं आहे. मी लहान असताना मला स्केटिंग करायला आवडायचं. स्केटिंग करण्यात माझा बराच वेळ जायचा. अंडर-14 रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपही त्याने मिळवली होती. पण जेव्हा ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा ते प्रचंड रागावले. एवढंच नव्हे तर त्यांनी माझी ट्रॉफीही फेकून दिली, असं युवराजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वडिलांनी सांगितलं, तू क्रिकेटच खेळ!
युवराजने या पोस्टमध्ये तो क्रिकेट खेळायला का लागला? यावरही भाष्य केलं. वडिलांनी मला सक्त ताकीद दिली. त्यांनी सांगितलं की तू क्रिकेट खेळ… त्यासाठी मन लावून तयारी कर… वडिलांनी सांगितल्यानंतर मी अजिबात इकडे तिकडे लक्ष दिलं नाही. मी माझं पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केलं, असं युवराजने सांगितलं. पुढे युवराजने लिहिलंय की, माझे वडील नसते, तर मी क्रिकेटर झालो नसतो…
View this post on Instagram
वडिलांनी सांगितलं अन् युवराजने ऐकलं… त्यावेळी युवराजला माहिती नव्हतं, की आपण क्रिकेटमध्ये इतकं नाव कमावू. पण वडिलांनी सांगितल्यानंतर युवराजने त्यांचा सल्ला मनावर घेतला. भरपूर मेहनत केली अन् त्यानंतर क्रिकेटमध्ये जे काम केलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे.
युवराजचं करिअर
युवराजने भारतासाठी 304 वन डे मॅच खेळल्या.यात त्याने 36.55 च्या सरासरीने 8701 रन केल्या. यावन डे दरम्यान त्याने 14 शतकं झळकावली. तर 52 अर्धशकतं युवराजने केली. 58 टी 20 मॅच त्याने खेळल्या. 28.02 सरासरीने 136.38 स्ट्राइक रेट ने 1177 रन केले. टी 20 मध्ये त्याच्या नावावर आठ अर्धशतकं आहेत. युवराजने 40 टेस्ट मॅच खेळल्या. 33.92 च्या सरासरीने त्याने 1900 धावा केल्या आहेत. टेस्ट मॅचमध्ये तीन शतकं आणि 11 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. हा बॉलमध्ये सहा सिक्स युवराजने मारले होते. त्यांच्या या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली होती.
