ENG vs IND : 97 धावा आणि रेकॉर्ड फिक्स, यशस्वीला महाविक्रमाची संधी, सुनील गावसकरांना पछाडणार?
Yashasvi Jaiswal Test Record : टीम इंडियाचा स्टार ओपनर यशस्वी जैस्वाल याच्याकडे दुसऱ्या कसोटी सामन्यात दिग्गज सुनील गावसकर यांच्यासह राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांना पछाडण्याची संधी आहे.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा 2 ते 6 जुलैदरम्यान बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियाचा लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियावर दुसर्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. भारताकडून पहिल्या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सर्वात आधी शतक केलं. यशस्वीला आता दुसर्या सामन्यात मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. यशस्वीला कसोटीत वेगवान 2 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यशस्वीने असं केल्यास तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल. यशस्वीला वेगवान 2 हजार कसोटी धावा करण्यासाठी 97 धावांची गरज आहे.
यशस्वीने आतापर्यंत 20 कसोटी सामन्यांमधील 38 डावांत 1 हजार 903 धावा केल्या आहेत. यशस्वीने दुसऱ्या सामन्यात 97 धावा केल्यास तो दिग्गज सुनील गावसकर यांना मागे टाकेल. यशस्वीला यासह गावसकरांचा 49 वर्षांपूर्वींचा विक्रम मोडीत काढत टीम इंडियासाठी वेगवान 2 हजार धावा करणारा पहिला बॅट्समन हा बहुमान मिळण्याची संधी आहे. यशस्वीने पहिल्या सामन्यात शतक केलं होतं. त्यामुळे यशस्वीने दुसऱ्या सामन्यातही शतक करुन हा विक्रम मोडीत काढावा, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे.
यशस्वी सुनील गावसकरांचा रेकॉर्ड ब्रेक करणार?
सुनील गावसकर यांनी 23 व्या कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार धावा केल्या होत्या. गावसकरांनी 1976 साली 7-12 एप्रिल दरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये विंडीज विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात 2 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. या यादीत माजी सलामीवीर गौतम गंभीर दुसऱ्या स्थानी आहे. गंभीरने 24 व्या कसोटीत 2 हजार धावा पूर्ण केल्या. तर कसोटीत वेगवान 2 हजार धावा करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमॅन यांनी 15 कसोटी सामन्यांमध्ये हा कारनामा केला होता.
सेहवाग-द्रविडला पछाडण्याची संधी
तसेच डावांनुसार कसोटीत भारतासाठी वेगवान 2 हजार धावा करण्याचा विक्रम हा वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या दोघांच्या नावावर आहे. दोघांनी 40 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तसेच यशस्वीने 38 डावात बॅटिंग केली आहे. आता यशस्वीने दुसर्या कसोटीतील पहिल्या डावात 97 धावा केल्यास तो 2 दिग्गजांनाही पछाडेल. यशस्वीने आतापर्यंत कसोटीत इंग्लंड विरुद्ध एकूण 6 सामन्यांमध्ये 817 धावा केल्या आहेत. त्यामुळे यशस्वी दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
