ENG vs IND : विजयासाठी काहीही, पाचव्या सामन्यात या खेळाडूची अचानक एन्ट्री होणार, कोण आहे तो?

England vs India 5th Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचवा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. त्यामुळे या सामन्यातील पाचव्या दिवशी संघाला जिंकून देण्यासाठी स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री होऊ शकते.

ENG vs IND : विजयासाठी काहीही, पाचव्या सामन्यात या खेळाडूची अचानक एन्ट्री होणार, कोण आहे तो?
ENG vs IND Test
Image Credit source: Bcci
| Updated on: Aug 04, 2025 | 3:28 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. इंग्लंडला केनिंग्टन ओव्हलमध्ये विजयासाठी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी फक्त 35 धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडावर आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करणार की इंग्लंड सामन्यासह मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मात्र अंतिम दिवसाच्या काही तासांआधी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने दिलेल्या एका अपडेटमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. गरज लागल्यास क्रिस वोक्स बॅटिंगसाठी येऊ शकतो, असं जो रुटने म्हटलंय.

क्रिस वोक्सला दुखापत

इंग्लंडचा बॉलिंग ऑलराउंडर क्रिस वोक्स याला पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली. करुण नायर याने पहिल्या डावात मारलेला फटका रोखताना वोक्सला दुखापत झाली. करुणने मारलेला फटक्याचा वोक्सने पाठलाग केला. वोक्सने अखेरच्या क्षणी चेंडू रोखण्यासाठी डाईव्ह मारली. या प्रयत्नात वोक्स सीमारेषेपार गेला. त्यामुळे वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे फिजिओ वोक्सला मैदानाबाहेर घेऊन गेले. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वोक्स पाचव्या सामन्यातील उर्वरित खेळात खेळणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

वोक्सला अशाप्रकारे चौकार रोखण्याच्या प्रयत्नात मारलेली डाईव्ह चांगलीच महागात पडली. त्यामुळे वोक्स पहिल्या डावात बॅटिंगसाठी आला नाही. त्यामुळे नववी विकेट गमावताच इंग्लंड ऑलआऊट झाली. इंग्लंडने भारताच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात 247 धावा केल्या. त्यामुळे वोक्स दुसऱ्या डावातही बॅटिंगला येणार नाही, हे स्पष्ट होतं. मात्र आता सामना रंगतदार स्थितीत पोहचला असल्याने वोक्स बॅटिंगला येऊ शकतो, अशी माहिती जो रुट याने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली.

भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 374 धावांची गरज होती. जो रुट आणि हॅरी ब्रूक या जोडीने चौथ्या दिवशी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. यामुळे इंग्लंडलने 300 पार मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंड चौथ्याच दिवशी जिंकून मालिका आपल्या नावावर करेल, अशी शक्यता होती. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं.

भारताने हॅरी ब्रूक याला आऊट करत इंग्लंडला चौथा झटका दिला. त्यानंतर भारताने जेकेब बेथेल आणि जो रुट या दोघांना आऊट करत इंग्लंडला 6 झटके दिले. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 3 विकेट्सच हव्यात, असं समीकरण होतं.सामना रंगतदार स्थितीत असताना वाईक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला. त्यानंतर जो रुट याने वोक्सबाबत पत्रकार परिषेदत काय म्हटलं? जाणून घेऊयात.

क्रिस वोक्स दुखापतीसह मैदानात उतरणार

जो रुटने काय सांगितलं?

“ख्रिस वोक्स शेवटच्या दिवशी गरज पडल्यास बॅटिंग करण्यासाठी तयार आहे. तुम्ही वोक्सला ड्रेसिंग रुममध्ये सफेद कपड्यात पाहिलं असेल. ही अशी मालिका आहे ज्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागलं आहे”, असं जो रुटने म्हटलं.