ENG vs IND : केएलच्या निशाण्यावर सचिनचा रेकॉर्ड, केनिंग्टन ओवलमध्ये क्रिकेटच्या देवाला पछाडणार?
KL Rahul England vs India 5th Test : केएल राहुल याला इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर याला मागे टाकून मोठा कीर्तीमान करण्याची संधी आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केएलने चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 90 धावा केल्या. केएलने कर्णधार शुबमन गिल याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत सामना अनिर्णित राखण्यात निर्णायक भूमिका बजावली. केएलने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 4 कसोटी सामन्यांमधील 8 डावात 511 धावा केल्या आहेत. भारतीय संघ इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी कोणत्याही स्थितीत पाचवा आणि अंतिम सामना जिंकावाच लागणार आहे. पाचवा सामना 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहे. केएलला या सामन्यात माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला पछाडण्याची संधी आहे.
केएल सचिनला पछाडणार?
केएल राहुल याने आतापर्यंत केनिंग्टन ओवलमध्ये 1 शतकांसह एकूण 249 कसोटी धावा केल्या आहेत. केएल या मैदानात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय आहे. केएलकडे सचिनला पछाडत दुसऱ्या स्थानी विराजमान होण्याची संधी आहे. केएलला त्यासाठी फक्त 24 धावांची गरज आहे. सचिनने या मैदानात 272 धावा केल्या आहेत. आता केएल पाचव्या सामन्यात 24 धावा करत सचिनला मागे टाकणारा का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
केनिंग्टन ओव्हलमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय
- राहुल द्रविड : 443 धावा
- सचिन तेंडुलकर : 272 धावा
- रवी शास्त्री : 253 धावा
- केएल राहुल : 249 धावा
- गुंडप्पा विश्वनाथ : 241 धावा
केएलचा इंग्लंडमध्ये शतकांचा चौकार
केएलने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 4 कसोटी शतकं ठोकली आहेत. सचिननेही इंग्लंडमध्ये 4 कसोटी शतकं झळकावली आहेत. त्यामुळे आता केएलकडे पाचव्या कसोटीत शेकडा करुन सचिनला मागे टाकण्याची संधी आहे.
11 वर्षांपूर्वी कसोटी पदार्पण
केएलने 2014 साली कसोटी पदार्पण केलं होतं. केएलने तेव्हापासून भारताचं 62 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. केएलने कसोटीत 10 शतकं आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 768 धावा केल्या आहेत.
इंग्लंडकडून 15 सदस्यीय संघ जाहीर
दरम्यान यजमान इंग्लंड पाचव्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडने 28 जुलैला पाचव्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंडने या सामन्यासाठी संघात अष्टपैलू जेमी ओव्हरटन याचा समावेश केला आहे. जेमीचं यासह 3 वर्षांनंतर कमबॅक झालं आहे.
