IND vs ENG : 4 खेळाडूंचं पदार्पण! पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल?
England vs India 1st Test Playing 11 : टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंड लायन्स विरुद्ध चमकदार कामगिरी करत पहिल्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनसाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे कुणाला संधी द्याची आणि कुणाला नाही? हा मोठा प्रश्न निवड समितीसमोर आहे.

टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने शुबमनला कर्णधार करण्यात आलं आहे. तसेच विराट कोहली यानेही टेस्ट क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे रोहित आणि विराटच्या जागी कोण खेळणार? याचीही प्रतिक्षा चाहत्यांना आहे. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार आणि नसणार? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
ओपनिंग कोण करणार?
रोहित शर्मा याने निवृत्ती घेतल्याने त्याच्या जागी आता यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगला कोण येणार? हा प्रश्न आहे. एका जागेसाठी अनेक खेळाडूंमध्ये चुरस आहे. तर यशस्वी ओपनर म्हणून खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
शुबमन गिल तिसऱ्या स्थानी खेळणार!
कर्णधार शुबमन गिल तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. शुबमन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तिसऱ्या स्थानी खेळत आहे. शुबमन त्याआधी ओपनर म्हणून खेळायचा. तसेच शुबमनवर आता नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शुबमन बॅटिंगसह ही नेतृत्वाची जबाबदारी कशी सांभाळतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं अधिक लक्ष असणार आहे.
तसेच करुण नायर याला निवड समितीने अनेक वर्षांनंतर संधी दिली आहे. तसेच करुणने इंग्लंड लायन्स विरुद्ध अनऑफिशियल टेस्टमध्ये द्विशतक केलं होतं. त्यामुळे करुणला चौथ्या स्थानी बॅटिंगची संधी मिळू शकते.
मिडल ऑर्डरची भिस्त कुणावर?
उपकर्णधार ऋषभ पंत याच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. पंत पाचव्या स्थानी खेळू शकतो. तसेच नितीश कुमार रेड्डी याला बॅटिंग ऑलराउंडर म्हणून संधी दिली जाऊ शकते. नितीशने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निर्णायक क्षणी झुंजार शतक करत आपली छाप सोडली होती. नितीश बॅटिंगसह बॉलिंगही करतो. त्यामुळे नितीशकडून अधिकची आशा असणार आहे.
अश्विन, रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर या अनुभवी ऑलराउंडर जोडीकडून टीम इंडियाला अनेक अपेक्षा आहेत. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये शतक केलं होतं. त्यामुळे दोघेही प्लेइंग ईलेव्हनसाठी प्रबळ दावेदार आहेत.
वेगवान गोलंदाज
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळणार आहे. बुमराह पहिल्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मोहम्मद सिराज याचाही समावेश केला जाऊ शकतो. तर अर्शदीप सिंह याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. तसेच अर्शदीप,यशस्वी, नितीश कुमार रेड्डी आणि करुण नायर या चौघांना संधी मिळाली तर त्यांचं इंग्लंडमधील पदार्पण ठरेल.
