Shubman Gill : 2 शतकं आणि 1 द्विशतक, 4 डावात 585 धावा, शुबमनच्या निशाण्यावर सर डॉन ब्रॅडमॅन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड
Shubman Gill Most runs in a series in Tests Record : शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यातील 2 कसोटी सामन्यांमधील 4 डावात जबरदस्त कामगिरी केली आणि असंख्य फलंदाजांना मागे टाकलं. आता शुबमनकडे या मालिकेत दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन यांचा वर्ल्ड रेकर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

शुबमन गिल कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र शुबमनने फलंदाज म्हणून इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी केली. शुबमनला इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. तर शुबमनने या दौऱ्याआधी इंग्लंड विरुद्ध कसोटीत फक्त 100 धावाच केल्या होत्या. त्यामुळे शुबमनच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांतच खोऱ्याने धावा केल्या आणि टीकाकारांना चोख उत्तर दिलं.
शुबमनने 4 डावात जवळपास 600 धावा करुन त्याच्या क्षमेतवर शंका घेणाऱ्यांना कामगिरीनेच उत्तर दिलं. शुबमनने आतापर्यंत या मालिकेत केलेल्या या धावांमुळे त्याला दिग्गज माजी क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमॅन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
शुबमनची 4 डावांत कमाल बॅटिंग
मला या 5 सामन्यांच्या मालिकेत सर्वोत्तम फलंदाज व्हायचं आहे, असं शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी म्हटलं होतं. शुबमनने त्याचं हे वाक्य पहिल्या 2 सामन्यांतच खरं करुन दाखवलं. शुबमनने 2 सामन्यांमध्ये 1 द्विशतक आणि 2 शतकं झळकावली आहेत. शुबमनने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी कारकीर्दीतील 59 डावांत एकूण 1 हजार 893 धावा केल्या होत्या. शुबमनने डिसेंबर 2020 मध्ये डेब्यू केलं होतं. शुबमनला तेव्हापासून जवळपास 5 वर्षांत 2 हजार धावा पूर्ण करता आल्या नाहीत. मात्र शुबमनने इंग्लंडमधील 4 डावांत सर्व चित्र बदलून टाकलं.
शुबमनच्या 4 डावांत 585 धावा
शुबमनने आतापर्यंत या मालिकेतील इंग्लंड विरुद्धच्या 2 सामन्यांमधील 4 डावांत 585 धावा केल्या आहेत. शुबमनने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 24 टक्के धावा या 4 डावांतच केल्या. यावरुन शुबमन काय प्रकारे खेळलाय, हे सिद्ध होतं. त्यामुळे आता शुबमनला ब्रॅडमॅन यांना मागे टाकण्याची संधी आहे.
शुबमन वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार?
सर डॉन ब्रॅडमॅन यांनी 1930 साली इंग्लंड विरुद्ध एकाच मालिकेत 974 धावा केल्या होत्या. ब्रॅडमॅन यांचा तो वर्ल्ड रेकॉर्ड अजूनही कायम आहे. तेव्हापासून एकाही फलंदाजाला एका मालिकेत 900 धावाही करता आल्या नाहीत. मात्र आता शुबमनकडे ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. शुबमनला या मालिकेत आणखी 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे शुबमनने आणखी 389 धावा केल्यास ब्रॅडमॅन यांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यात यशस्वी होईल.