
टीम इंडियाला इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध 2007 नंतर कसोटी मालिका जिंकण्यात यंदाही यश मिळवता आलं नाही. मात्र भारताने इंग्लंडलाही ही मालिका जिंकून दिली नाही. भारताने चौथ्या सामन्यात मालिकेत पछाडल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. भारताने लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये झालेला पाचवा आण अंतिम सामना अवघ्या 6 धावांनी जिंकत मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर आता भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार आता कोणत्याही खेळाडूला मर्जीनुसार कोणत्या सामन्यात खेळायचं आणि कोणत्या नाही, हे ठरवता येणार नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर या दोघांनी हा निर्णय घेतल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
भारतीय संघात आता कोणतंही व्हीआयपी कल्चर चालणार नाही. खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी उपलब्ध रहावं लागेल, असं गंभीर-आगरकर जोडीचं म्हणणं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बीसीसीआय वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या रिपोर्ट्नुसार, याबाबत चर्चा झाला. तसेच वार्षिक करार असलेल्या खेळाडूंना मर्जीनुसार कोणत्या सामन्यात खेळायचं हे ठरवता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
गंभीर-आगरकर यांच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला बुमराहचा सर्व 5 सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय पटला नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये कार्यरत टीमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, “असं नाही की खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष दिलं जात नाही. वेगवान गोलंदाजांसाठी वर्कलोड महत्त्वाचं आहे. मात्र वर्कलोडच्या नावावर खेळाडूंना महत्तवाच्या सामन्यातून विश्रांती घेता येणार नाही”, असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं. बुमराह इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 3 कसोटी सामने खेळला. भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असल्याने पाचवा आणि अंतिम सामना करो या मरो असा होता. मात्र त्यानंतरही बुमराह या सामन्यात वर्कलोडमुळे खेळला नाही.
रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाला प्रत्येक खेळाडूकडून मोहम्मद सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यासारखी कामगिरी अपेक्षित आहे. सिराजने मालिकेतील पाचही सामने खेळले. तर स्टोक्सला दुखापतीमुळे पाचव्या सामन्याला मुकावं लागलं. मात्र स्टोक्सने त्याआधी चारही सामन्यात जोर लावला. स्टोक्सच्या खांद्याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली. मात्र स्टोक्सने दुखापतीकडे दुर्लक्ष करत एका स्पेलमध्ये जास्तीत जास्त ओव्हर बॉलिंग केली. त्यामुळे खेळाडू वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाखाली गैरफायदा घेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. त्यामुळे आता येत्या काळात बीसीसीआयकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो? याकडे क्रिकेटपटूंसह चाहत्यांचंही लक्ष असणार आहे.