Retirement : आगामी कसोटी मालिकेतून डच्चू मिळताच स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, कोण आहे तो?
Cricket Retirement : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेनंतर एका अनुभवी खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. जाणून घ्या.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आता मायदेशात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली दुसरी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने अहमदाबाद आणि नवी दिल्लीत होणार आहेत. टीम इंडियाने याआधी इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर आता एका अनुभवी खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ख्रिस वोक्सच्या निवृत्तीबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. वोक्सची 14 वर्षांची क्रिकेट कारकीर्द राहिली.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीतून डच्चू
इंग्लंड टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर थेट ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेड बॉल क्रिकेट मॅचेस खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 नोव्हेंबरपासून प्रतिष्ठेची अॅशेस सीरिज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी 23 सप्टेंबरला अॅशेस सीरिजसाठी संघ जाहीर केला. या सीरिजमधून ख्रिस वोक्सला वगळण्यात आलं. ख्रिसने त्याला डच्चू मिळाल्याने हा असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
ख्रिस वोक्सची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
ख्रिस वोक्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही 14 वर्षांची राहिली. ख्रिसने इंग्लंडचं कसोटी, वनडे आणि टी 20i अशा एकूण आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. ख्रिस 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 217 सामने खेळला. ख्रिसने या 14 वर्षांत बॉलिंग ऑलराउंडर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.
ख्रिसने 122 एकदिवसीय, 62 कसोटी आणि 33 टी 20i सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. ख्रिसने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 192, 173 आणि 31 विकेट्स मिळवल्या. तसेच ख्रिसेने बॅटिंगनेही योगदान दिलं.
ख्रिसने कसोटी क्रिकेटमधील 99 डावांत 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 2 हजार 34 धावा केल्या. तसेच ख्रिसने वनडेत 6 अर्धशतकांसह 1 हजार 524 धावांचं योगदान दिलं. तर 33 टी 20i सामन्यांमध्ये ख्रिसने 146 रन्स केल्या.
ख्रिस वोक्सने काय म्हटलं?
“तो क्षण आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी ही वेळ योग्य असल्याचं मी ठरवलं आहे. माझं लहानपणापासून इंग्लंडचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न होतं. मी माझ्या घरामागील बागेत बसून इंग्लंडसाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी माझं स्वप्न जगलो. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो”, असं म्हणत ख्रिस वोक्सने निवृत्ती जाहीर केली.
